पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचं काम महापालिका प्रशासनाकडून असले सध्या पुणे शहरामध्ये सर्वच राजकीय पक्षाकडून भारतीय जनता पक्षाने या प्रभाग रचनेमध्ये आपल्या सोयीनुसार रचना केल्या असल्याची चर्चा सुरू आहे. एकीकडे भाजप प्रभागांची तोडफोड करून आपल्या सोयीप्रमाणे प्रभाग रचना बनवत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत असला तरी पुणे शहरातील मागील तीन निवडणुका पासून राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्ष यांचा प्रभाग स्तरावर असलेल्या संघर्ष राज्यातील नव्या युतीमुळे प्रकर्षाने अडचणीचा ठरत आहे. पुणे महापालिकेतील मागील निवडणुकीचा आढावा घेतल्यास क्रमांक एक व दोन या दोन्ही ठिकाणी मित्र पक्षातील भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्याने या ठिकाणचा सत्ता संघर्ष टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाने अनोखी रणनीती आखली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पुणे महापालिकेमध्ये सर्व प्रभागांमध्ये केलेल्या सर्वेनुसार महाविकास आघाडीचे नवे तर राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं आव्हान आपल्या समोर असल्याचे जाज्वल्य सत्य समोर आले असून या वरती रामबाण उपाय म्हणून प्रभाग रचनेमध्ये मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक कसे कमी निवडून येतील अशी रचना करण्यामध्येच भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती वापरली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या पुणे महापालिकेमध्ये माजी नगरसेवकांच्या दृष्टिकोनातून बलाबल पाहिलं तर भाजप नंतर दुसऱ्या क्रमांकावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी येते. शिवसेना एकत्र असताना देखील पुण्यामध्ये सेनेची ताकद मर्यादितच राहिली आहे. आणि आता त्यांचे दोन गट झाल्यानंतर ती ताकद विभागली गेली आहे. भारतीय जनता पक्षाला संपूर्ण पुणे शहरामध्ये शिवसेनेची दखलपात्र ताकद कोणत्याही प्रभागात दिसून आली नाही. त्याबरोबरच पारंपारिक विरोधक असलेली काँग्रेस आउटगोइंग आणि अंतर्गत गटबाजीमुळे संघर्ष करत असल्याने स्थानिक पातळीवरती लक्षणीय वाढ अशक्य आहे. तसेच शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद देखील 2012 च्या निवडणुकीप्रमाणे राहिलेली नाही. एकंदरीत राष्ट्रवादीत अजितदादांकडे पुण्यातील सर्वाधिक नेते आणि कार्यकर्ते आहेत. त्यामुळे खरा प्रतिस्पर्धी हा दादांचा पक्ष असल्याचं भाजपला वाटत असल्याचं बोललं जात आहे.
पुणे महापालिका निवडणुकीमध्ये सध्या भाजप युती करण्याच्या मानसिकतेत नाही. स्वबळावर निवडणूक लढल्यास भाजपला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्वात मोठे आव्हान वाटत आहे. त्यामुळे या प्रभाग रचनेत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याची रणनीती भाजपकडून आखण्यात आली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रभाग रचना करताना अजित पवारांची ताकद असलेल्या उपनगरांमध्ये मोठमोठे प्रभाग केल्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शहरातील वडगावशेरी, हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांच्या शहरी भागात राष्ट्रवादीची चागली ताकद आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुती झाली नाही, किंवा झाली तरी या भागात राष्ट्रवादीचे कमी नगरसेवक कसे निवडून येतील, याची खबरदारी भाजपने घेतली असल्याचे बोलले जात आहे. प्रभाग रचनेच्या माध्यमातूनच अजित पवारांना खिंडीत गाठण्यासाठी पुणे भाजपाने अनोखी रणनिती आखत पुणे शहरातील ८०% प्रभागात मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी स्पर्धक निष्प्रभ करण्यासाठी नवं चक्रव्यूह आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
थेट मुंबईकडे शिवसेना अन् राष्ट्रवादीचाही मोर्चा
पुणे महानगरपालिकेचे प्रभाग रचनेच काय वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर महायुतीतील तिन्ही मित्र पक्षांची चर्चा झाली. राज्यातील वरिष्ठांच्या आदेशाने एकत्रित काम करण्याचा निर्णय झाला मात्र नंतर भाजपच्या नेत्यांनी वरिष्ठांकडून आदेशात नसल्याचे सांगत शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रभाग रचनेच्या चर्चेतून दूरच ठेवलं असल्याचं सांगितलं जात आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे आधी शिवसेनेने आणि त्यानंतर राष्ट्रवादीने देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली असल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिक पातळीवर जरी विचारात घेतलेला नसला तरी आता नगर विकास खात्याकडे प्रभाग रचना गेल्याने त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर काय होईल, याची चर्चा आहे. त्यामुळे तीनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे लक्ष लागल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.