दुर्ग श्री लोहगड अभ्यास व स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पडली 

0
17

श्री दुर्ग संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रविवार दि. ०३ ऑगस्ट २०२५ रोजी लोहगड येथे अभ्यास व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमे मध्ये गडाचा ऐतिहासिक अभ्यास, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृती अशा अनेक गोष्टींचा समावेश होता.

मोहिमेची सुरुवात गडावरील महादेवाच्या शिवलिंगाचे पूजन व दर्शनाने करण्यात आली. त्यानंतर महादेवाच्या मंदिरासमोरील जुना भगवा ध्वज उतरवून नविन ध्वज बसवण्यात आला. तसेच अष्टकोनी पाण्याचे टाके, महादरवाजा व बुरुजवरील वाढलेले गवत व झाडे काढुन साफ करण्यात आले, तसेच प्लास्टिक व कचऱ्याचे संकलन करुन योग्य विल्हेवाट लावण्यात आली आणि “गड वाचवा, इतिहास जपा” या संकल्पनेनुसार पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गड परिसरात जनजागृती पोस्टर्स देखील लावण्यात आले.या मोहिमेत संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व स्थानिक गडप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गडाच्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत श्रमदान, इतिहासवाचन व वास्तू अभ्यास करण्यात आला. अभ्यासकांनी लोहगडावरील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंचे – गणेश दरवाजा, हनुमान बुरुज, ध्वजस्तंभ, पाण्याची टाकी, विनायक दरवाजा यांचे सविस्तर निरीक्षण केले व नोंदी केल्या. तसेच भविष्यात गडाच्या संवर्धनासाठी कोणत्या गोष्टी करता येतील यावर चर्चा व प्राथमिक अभ्यासही करण्यात आला.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

ही मोहीम दुर्गसंवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरली आहे. संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, राज्यातील इतर किल्ल्यांवर देखील अशाच अभ्यास व स्वच्छता मोहिमा राबवण्यात येणार आहेत. श्री दुर्ग संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व शिवभक्त, स्वयंसेवक, सहकार्य करणारे स्थानिक नागरिक, मार्गदर्शक व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!