सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण सरकारला झटका; ‘सर्वोच्च’चा निर्णय? नक्की काय घडले होते परभणीत?

0
20

परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी एक नवीन अपडेट समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले होते.आता सर्वोच्च न्यायालयानेही हा आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे आरोपी पोलिसांवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

परभणीत १० डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या हिंसाचारात ताब्यात घेण्यात आलेला आणि त्यानंतर पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी एक मोठा विजय मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. याप्रकरणी दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे सोमनाथच्या कुटुंबियांच्या आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या लढ्याला यश मिळाले आहे.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली. सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणी उच्च न्यायालयाने पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याविरोधात पोलीस सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात याबद्दलची सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

काय घडले होते परभणीत?

१० डिसेंबर २०२४ रोजी परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. या घटनेनंतर आंबेडकरी संघटनांनी परभणीत तीव्र आंदोलन केले आणि बंद पुकारला होता. या बंदला अचानक हिंसक वळण लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तसेच लाठीचार्जही करण्यात आला. याचवेळी मूळचा लातूरचा आणि पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र अवघ्या दोनच दिवसांत पोलीस कोठडीत सोमनाथचा मृत्यू झाला होता.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

सोमनाथच्या आईने या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या याचिकेवर सोमनाथची बाजू मांडली होती. उच्च न्यायालयाने पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या प्रकरणी मोठा विजय मिळाल्याचे बोललं जात आहे.