बाणेर बालेवाडी वाहतूक कोंडी; जमीन अधिग्रहण जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार: ना. चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

0
1

कोथरुड मतदारसंघात पुणे महापालिका स्मार्ट सिटी चा भाग म्हणून विकसित होत असलेल्या बाणेर-बालेवाडी-पाषाण- सोमेश्वरवाडी- सुतारवाडी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मिसिंग लिंक पूर्ण करणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये या भागाचा समावेश करण्यात आला त्यानंतर या भागात विकास आराखडा ही तयार करण्यात आला परंतु विकास आराखड्यातील आरक्षित जागा आणि वाहतुकीचा विचार करून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांबाबत प्रलंबित विषय आहेत. यातील अनेक विषय जमीन अधिग्रहणाअभावी प्रलंबित पडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे, ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यास महापालिकेला अपयश येत असल्याबद्दल तीव्र नाराजी ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

बाणेर-बालेवाडी-पाषाण- सोमेश्वरवाडी- सुतारवाडी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी आढावा बैठक झाली. या बैठकीला वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, महापालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे, उपअभियंता दिलीप काळे, कनिष्ठ अभियंता शिवानंद पाटील, भाजपा सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, भाजप नेते प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, सचिन पाषाणकर, उमाताई गाडगीळ, उत्तर मंडल सरचिटणीस अस्मिता करंदीकर, सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

सुरुवातीला मागील बैठकीतील इतिवृत्तानुसार काय कार्यवाही झाली याची माहिती ना. पाटील यांनी घेतली. यात प्रामुख्याने बाणेर-पाषाण लिंक रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे दोन महिन्यांत संपादन करून जमीन ताब्यात आल्यानंतर चार महिन्यांच्या कालावधीत हा रस्ता पूर्ण करावा,’ असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला दिले असतानाही अद्याप सदर विषयावर कार्यवाही झाली नाही, त्यावर ना. पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर मधील लक्ष्मीमाता मंदिर येथील रस्ता रुंदीतरण यांसह वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे, खड्डेमय रस्ते, नादुरुस्त पदपथ आदींवर चर्चा झाली. त्यासोबतच मिसिंग लिंकची समस्या सोडवण्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण होत नसल्याने त्यावर ही नापसंती व्यक्त केली.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

त्यामुळे सदर प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, वाहतूककोंडीस कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.