बीड : ध्वनी प्रदूषणामुळे आवाज कमी करावा या मागणीची तक्रार केल्याच्या कारणास्तव संतापलेल्या गावच्या सरपंचासह 10 साथीदारांनी गावातील महिलेलाच बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली. अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट पसरली आहे.सध्या मारहाण करणारे दहा जण फरार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या आणि तालुक्यातील सनगाव येथील रहिवासी अॅड. ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान या महिलेने सनगाव गावात ध्वनिप्रदूषणामुळे त्रास होत असल्याची तक्रार केली होती. महिलेला मायग्रेनचा त्रास होत असल्याने लाऊडस्पीकर लावू नयेत, घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. याचा राग मनात धरून याच गावचे सरपंच अंजान आणि त्याच्या 10 कार्यकर्त्या्ंनी ज्ञानेश्वरी मारहाण केली.
शेतात महिलेसोबत नेमकं काय घडलं?
महिला शेतात कैऱ्या आणण्यासाठी जात असतांना बांधाजवळ गेली असता सहा आरोपींनी हातात काळ्या रबरी पाईप घेतले आणि इतर तीन आरोपी हातात लाकडी काठ्या घेऊन तिच्याजवळ आले. तू या पूर्वी गावातील पिठाच्या गिरण्या आणि मंदिरावरिल भोंग्याच्या तक्रारी का दिल्यास तसेच तुझ्या आईची कोर्टात सुरु असलेली 307 ची केस का काढून घेत नाहीस अशी विचारणा केली. तू जर यापुढे आमच्या विरुध्द तक्रार देशील का असे म्हणून त्यांनी हातातील काठ्या व रबरी पाईपने पाठीवर, मानेवर कमरेवर दोन्ही पायाचे पाठीमागील पायावर मारहाण करत गंभीर दुखापत केली.
शेतात महिलेचा विनयभंग
तसेच तीन आरोपींनी तिच्या हाताला धरुन बाजूला नेत विनयभंग केला. एका आरोपीने तिला खल्लास करुन टाका असे म्हणत घाणेरड्या शिव्या दिल्या. तसेच तिचे चुलते योगीराज अंजान व चुलती अर्चना अंजान यांनाही मारहाण झाल्याची तक्रार महिलेने केली आहे.
दहा जणांची नावं समोर
या प्रकरणी युसूफ वडगाव पोलिसात अनंत रघुनाथ अंजान, सुधाकर रघुनाथ अंजान, राजकुमार ज्ञानोबा मुंडे, कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ज्ञानोबा बब्रुवान सपकाळ, नवनाथ ज्ञानोबा जाधव , मृत्युजय पांडुरंग अंजान , अंकुश बाबुराव अंजान , सुधीर राजाभाऊ मुंडे, नवनाथ दगडू मोरे सर्व राहणार सनगाव ता. अंबाजोगाई, बीड या 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.