काँग्रेस गटबाजी पुन्हा दिल्लीच्या दरबारी?; खासदार इमरान प्रतापगडी यांच्या ‘संविधान बचाव जनसभेला’ हे नेते अनुपस्थित

0
1

मुंबईत काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संविधान बचाव जनसभा’ या महत्त्वाच्या कार्यक्रमात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची अनुपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. मुंबई काँग्रेसमधील वाद आता दिल्ली दरबारी पोहचला आहे. मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. विद्यमान मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याविरोधात मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

‘संविधान बचाव जनसभा’ मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वाखाली पार पडली होती. या सभेत काँग्रेसचे राज्यसभा खासदार इमरान प्रतापगडी यांनी संविधानाच्या रक्षणासाठी देशभरातील जनतेने एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच येणाऱ्या बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पक्ष कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असा संदेशही त्यांनी दिला. कार्यक्रमात आमदार असलम शेख आणि आमदार अमीन पटेल हे उपस्थित होते. मात्र, माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि वरिष्ठ नेते नसीम खान या दोघांच्या अनुपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

वारंवार पक्षांतर्गत मतभेदांच्या चर्चेत येणारे नसीम खान आणि भाई जगताप हे सध्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याविरोधात असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी असल्याच्या चर्चा आधीपासूनच सुरू आहेत.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नसीम खान आणि भाई जगताप हे सध्या दिल्लीला रवाना झाले असून, काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बैठकीत सहभागी होणार आहेत. अधिकृतरीत्या ही भेट वेगळ्या कारणासाठी असल्याचे सांगण्यात येत असले, तरी दोन्ही नेते “मुंबई काँग्रेसमध्ये आपल्याला डावलले जात आहे” अशी तक्रारही यावेळी मांडणार असल्याची शक्यता आहे.