मुंढर गावी कृषीदिनानिमित्त चारसूत्री भातशेती लागवड प्रात्यक्षिक व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

0

मुंढर दि. ५ (रामदास धो. गमरे) गुहागर पंचायत समितीच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका कृषी अधिकारी क्षीरसागर यांच्या उपस्थितीत मुंढर ग्रामपंचायत येथे कृषीदिनाचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे यांनी प्रभावी व भारदस्त आवाजात सूत्रसंचालन व प्रस्ताविक सादर केले व कार्यक्रमाची रूपरेषा मांडताना कार्यक्रमा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या चारसूत्री भात लागवड व वृक्षारोपण हे उपक्रमांची माहिती दिली. सदर प्रसंगी मुंढर गावचे प्रगतशील शेतकरी विजय भिकू रामाणे यांच्या शेतात चारसूत्री भात लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले तेव्हा गटविकास अधिकारी शेखर भिलारे व तालुका कृषी अधिकारी क्षीरसागर यांनी उपस्थितांस कमी खर्च व कमी खतांचा वापर करून भरघोस उत्पादन देणाऱ्या चारसूत्री भात लागवड पद्धतीची माहिती दिली, कमी खतांचा वापर होत असल्याने जमिनीची सुपीकता व सेंद्रिय कर्ब वाढते, सुधारित / संकरित बियाणे वापरल्याने उत्पादकता वाढते म्हणून शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीस पर्याय असणाऱ्या सेंद्रिय पद्धतीची चारसूत्री भात लागवड करावी असे आवाहन केले, सोबतच एक पेड माँ के नाम (एक झाड आईच्या नावाचे) या अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी गटविकास अधिकारी शेखर भिलारे व कृषी अधिकारी क्षीरसागर यांनी वृक्षारोपणाचे महत्व विदित करताना मातीची धूप थांबून भूजल पातळी स्तर वाढतो, हवेतील कार्बनडायऑक्साईड कमी होऊन ऑक्सिजन पातळी सुधारते, प्रदूषण रोखण्यासाठी होणारी मदत, जलव्यवस्थापन असे अनेक फायदे सांगून वृक्षारोपण किती महत्वाचे आहे हे सोप्या व साध्या भाषेत समजावून दिले.

अधिक वाचा  एरंडवण्यात दिवाळीनिमित्त आपुलकीचे नाते दृढ करणारा भाऊबीजेचा सण; चंद्रकांतदादांच महिला भगिनींतर्फे औक्षण

सदर प्रसंगी कृषी विस्तार अधिकारी सर्जेराव कांबळे, कृषी विस्तार अधिकारी शरद भांड, कृषी विस्तार अधिकारी कृष्णदेव कदम, ग्रा.पं. अधिकारी सुरेश गोरे, सर्व कृषी मंडळ अधिकारी, सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत मुंढर सरपंचा आमिषा अजित गमरे, उपसरपंचा भक्ती धनावडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य मंडळ, माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकर शिर्के, माजी सरपंच प्रमोद शिर्के, गुहागर तालुका ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे अध्यक्ष साईनाथ बागूल, कृषी महाविद्यालय खरवतेचे विद्यार्थी, सर्व अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मुंढर जिल्हा परिषद शाळा क्र. १ चे मुख्याध्यापक दशरथ कदम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच उपस्थितीत भरघोस प्रतिसादात सदर कार्यक्रम संपन्न झाला, सरतेशेवटी ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे, प्रगतशील शेतकरी विजय भिकू रामाणे यांचे व उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  जनशक्ती पुढे महाशक्ती पराभूत! जैन बोर्डिंग व्यवहार रद्द होणार, नैतिकता अखेर जागृत व्यवहारातून बाहेर पडण्याचा विशाल गोखलेंचा निर्णय