राज्यात सध्या मराठी-हिंदी भाषेचा वाद पाहायला मिळत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदरमध्ये एका गुजराती व्यापाराला मारहाण केल्यावरुन मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मीरा-भाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यातच आता काल रात्रीपासून पोलिसांनी मनसेच्या अनेक प्रमुख नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले जात आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांना काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच दुसरीकडे मनसेच्या सर्व नेत्यांना कलम 163 अन्वये नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.
आज मीरा-भाईंदर येथे मनसेकडून आंदोलन आणि मोर्चाची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मनसैनिकांना नोटिसा जारी केल्या आहेत. मनसेचे सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांना मीरा-भाईंदर येथे जमू नये, अशा प्रकारची नोटीस बजवण्यात आली आहे. त्यासोबतच वसई-विरारमधील मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी पहाटे तीन वाजता घरातून उचलून ताब्यात घेतले आहे.
मनसे कार्यकर्त्यांची धरपकड
भाईंदरमधील मराठी मोर्चाच्या संभाव्य पार्श्वभूमीवर वसई-विरारमधील पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील, माजी नगरसेवक प्रफुल पाटील, वसई-विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर यांच्यासह शेकडो मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वसई, विरार, नालासोपारा पोलिसांनी घरातून उचलून पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवले आहे. त्यासोबतच मनसे नेते संदीप देशपांडे आणि माजी आमदार राजू पाटील यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
राजू पाटील, संदीप देशपांडेंना मीरा-भाईंदर परिसरात येण्यास बंदी
मनसे नेते राजू पाटील आणि संदीप देशपांडे या दोघांनाही पोलिसांची नोटीस मिळाली असून, त्यांना मीरा-भाईंदर परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. आजच्या मनसे मोर्चामुळे मीरा-भाईंदरमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी मनसेतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. संदीप देशपांडे यांच्या नोटीसीत त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत 14 गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भाषिक वाद, नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका, तसेच तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवत ही नोटीस बजावण्यात आली आहे. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांना देखील मोर्चामध्ये सहभागी होऊ नये यासाठी पोलिसांची नोटीस देण्यात आली आहे, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये.
मनसे नेते राजू पाटील आणि संदीप देशपांडे या दोघांनाही पोलिसांची नोटीस मिळाली असून, त्यांना मीरा-भाईंदर परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. याअगोदर अविनाश जाधव यांनाही नोटीस देण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.