पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळावर मोठी दुर्घटना घडली आहे. तळेगावजवळील इंद्रायणी नदीवर असलेला ३० वर्षे जुना लोखंडी पूल अचानक कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. या घटनेत आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत. त्यातील ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.






दुर्घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. वीकेंड असल्याने या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक पर्यटक पूलावर उभे असतानाच पूल कोसळून अनेकजण थेट नदीच्या प्रवाहात पडले. काही नागरिकांनी प्रसंगावधान राखत स्वत:ला काठावर आणले, तर इतरांचे जीव वाचवण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.
या संदर्भात माहिती देताना तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे अधिक्षक म्हणाले की, “आतापर्यंत ६ जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर एका व्यक्तीचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. दोन मृतदेह हाती लागले आहेत.”
मावळचे आमदार सुनील शेलके यांनी सांगितले की, “हा पूल अतिशय जुना असून त्याची नियमित देखभाल होत नव्हती. दुर्घटनेच्या वेळी सुमारे १०० लोक पूलावर उपस्थित होते. अनेकजण नदीत पडले पण काही जण काठावर पोहचू शकले.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून ते म्हणाले, “या दुर्घटनेबाबत मला अतिशय दुःख झाले आहे. मृतांना मी श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या दुर्घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली. “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. काही नागरिक वाहून गेले असण्याची भीती आहे. मी पुणे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी सर्व मदत पाठवण्याची तयारी दाखवली आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच, त्यांनी पावसाळ्याच्या काळात पर्यटनस्थळी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
जखमींचे उपचार पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये सुरू असून, गंभीर जखमींची विशेष काळजी घेतली जात आहे.












