पुणे विमानतळावर चारचाकी खासगी वाहनांसाठी १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबल्यास ₹५०० दंड

0

पुणे विमानतळ परिसरात वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, विमानतळ टर्मिनल परिसरात १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबणाऱ्या खासगी चारचाकी वाहनचालकांवर आता ₹५०० दंड लावण्यात येणार आहे.

हा प्रस्ताव दिल्ली मुख्यालयाकडे पाठवण्यात आला होता आणि तिथून मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी जाणवते. अनेक प्रवासी आणि वाहनचालक आपली वाहने तासन्तास पार्क करून ठेवतात, ज्यामुळे इतर वाहनांना आणि प्रवाशांना अडथळा निर्माण होतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबणाऱ्या वाहनांना ₹५०० दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

एक विशेष पथक तयार करण्यात आले असून, ते नियमांची अंमलबजावणी करणार असून नियम भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

या निर्णयाचे अनेक प्रवाशांनी स्वागत केले आहे. स्नेहा पटेल, या पुणे येथील नियमित प्रवासी म्हणाल्या, “हे पाऊल अत्यंत आवश्यक होतं. मी स्वतः अनेक वेळा टर्मिनलसमोरील ट्रॅफिकमुळे पिकअपसाठी उशीर झालेला अनुभवला आहे. हा नियम काटेकोरपणे राबवला गेला तर प्रवाशांचा वेळ वाचेल आणि संपूर्ण विमानतळ अनुभव अधिक सुलभ होईल.”