नगर रोडवरील सिग्नल-मुक्त आणि यु-टर्न योजनेविरोधात नागरिकांचा संताप

0

पुण्याच्या नगर रोडवर सिग्नल-मुक्त आणि जबरदस्तीच्या यु-टर्न योजना लागू केल्यानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “साहेब, नगर रोड कसा ओलांडायचा?” आणि “चुकीच्या यु-टर्नसाठी आम्ही का त्रास सहन करायचा?” अशा मजकुराचे फलक लावून नागरिकांनी निषेध व्यक्त केला.

वाहतूक विभागाने नगर रोडवरील ८ ट्रॅफिक सिग्नल बंद केल्यामुळे वाहनांची गती वाढली असल्याचा दावा केला आहे. मात्र, नागरिकांचा आरोप आहे की या योजनेत पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचारच करण्यात आलेला नाही. यु-टर्न पॉइंटवर कुठल्याही प्रकारची सुरक्षित व्यवस्था नाही, परिणामी मुलं, वृद्ध, महिलांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

शास्त्रीनगर चौक, आगाखान पॅलेस, रामवाडी हयात चौक, विमाननगर, सोमनाथनगर, टाटा गार्डरूम चौक, खुळवाडी फाटा, चंदननगर अंडरपास अशा अनेक महत्त्वाच्या चौकांवरील सिग्नल बंद करून यु-टर्न केवळ खराडीतील जुन्या नाक्यावर लागू केला आहे. परिणामी वाहनांची मोठी कोंडी होत असून अपघात व दिरंगाईच्या घटना वाढल्या आहेत.

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची कोणतीही पूर्वमिठी न घेता ही योजना अमलात आणली गेल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. प्रमोद देवकर, अनिल गालांडे आणि करीम शेख या कार्यकर्त्यांनी यु-टर्नच्या ठिकाणी बॅनर लावून निषेध व्यक्त केला.

दरम्यान, नगर रस्त्यावरचा BRT मार्ग अजूनही पूर्णपणे काढून टाकलेला नाही. केवळ बस थांबे काढले असून मधील डिव्हायडर अजूनही तसेच आहेत, त्यामुळे रस्ता अरुंद राहिलेला आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले, “ही योजना वाहन प्रवाह सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. ८ सिग्नल बंद केल्यामुळे १५ मिनिटांचा वेळ वाचतो. पादचाऱ्यांसाठी २० सेकंदाचा सिग्नल आणि अंडरपासचा वापर सुचवला आहे. PMC ला कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी पत्र दिले आहे.”

मात्र नागरिकांचा अनुभव वेगळा आहे. माजी नगरसेवकांनी सांगितले की, रामवाडी ते शास्त्रीनगर पर्यंत ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यांनी 112 हेल्पलाईनवर संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला, पण ट्रॅफिक काही सुटला नाही. एम्ब्युलन्सदेखील अडकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.