आंबेगाव पोलिसांची कारवाई; खून करून मध्य प्रदेशात पळालेल्या आरोपीला अटक

0
3

आंबेगाव पोलिसांनी खून करून मध्य प्रदेशात फरार झालेल्या आरोपीला अटक केली आहे. ही घटना १५ जून रोजी जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द परिसरात घडली होती. या प्रकरणात २१ वर्षीय रोहित धामल याचा खून झाल्याची नोंद करण्यात आली होती. रोहित हा योग मुद्रा बिल्डिंगमधील रहिवासी असून एका प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीत डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता.

या प्रकरणात आंबेगाव पोलिस ठाण्यात १६ जून रोजी खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत तांत्रिक पाळत आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. पोलिसांनी इंदोर, मध्य प्रदेश येथे आरोपी सूरज सूर्यवंशी (वय २२, रा. गणेश पेठ, पुणे) याला अटक केली. सूरज देखील रोहितप्रमाणेच त्या ई-कॉमर्स कंपनीत डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

या प्रकरणाबाबत माहिती देताना सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियांका गोरे म्हणाल्या, “आरोपी व मयत यांच्यात पूर्वीपासून ओळख होती. आरोपीने आपल्या मित्राच्या बहिणीच्या नावाने खोटा सोशल मीडिया अकाउंट तयार केले होते, यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. हाच वाद पुढे खुनात रूपांतरित झाला.”

गोरे यांनी सांगितले की, तांत्रिक पुरावे आणि स्थानिक माहितीचा आधार घेत आरोपीला इंदोरमधून शोधून काढले, आणि घटनेनंतर अवघ्या २४ तासांत त्याला अटक करण्यात आली.

सामाजिक माध्यमांवरील खोट्या अकाउंटमधून सुरू झालेल्या वादाने थेट एका युवकाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना आंबेगाव खुर्द येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला अटक केल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार