पाकिस्तानसाठी २०२३ पासून हेरगिरी सीआरपीएफ जवानाला अटक; अधिक तपासासाठी एनआयएकडे सुपूर्द

0
1

राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविणाऱ्या मोतीराम जाट नावाच्या सीआरपीएफच्या जवानाला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. वर्ष २०२३ पासून जाट हा पाकिस्तानी हेरांसाठी काम करत असल्याचे एनआयएकडून सांगण्यात आले आहे. देशाशी संबंधित संवेदनशील माहिती देण्याच्या बदल्यात पाक हेरांकडून तो पैसा घेत असे. जाट याला दिल्लीत पकडण्यात आले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

मोतीराम जाट याला पतियाळा हाउस न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची ६ जूनपर्यंत कोठडीत रवानगी केली. दरम्यान जाट याला सेवेतून बरखास्त करण्यात आले आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराने ऑपरेशन सिंदूर नावाने मोहीम राबविली होती. तेव्हापासून आतापर्यंत पाकसाठी काम करणाऱ्या अनेक हेरांना पोलीस आणि आणि तपास संस्थांनी पकडले आहे. हरियानातील ज्योती मल्होत्रा नावाच्या महिलेचे प्रकरण तर सध्या गाजत आहे.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

देशाकडून आखल्या जाणाऱ्या मोहिमांची तसेच सुरक्षा ठिकाणांची माहिती मोतीराम जाट पाक हेरांना देत असे. त्याच्या या कृत्यामुळे भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकला असता, असे एनआयएकडून न्यायालयास सांगण्यात आले. यावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश चरणजित सिंह यांनी जाट याची कोठडीत रवानगी केली. जाट याच्या हालचालींचा सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांना संशय आला होता. अधिक तपासासाठी एनआयएकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर त्याचे कारनामे चव्हाट्यावर आले होते.