





आगामी काळात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रमुख नियुक्ती केल्या आहेत. या नवनिर्वाचित प्रमुखांवर लोकसभा व विधानसभा मतदारसंघनिहाय पक्ष संघटनात्मक वाढीसाठी जबाबदारी सोपवल्या आहेत.याचवेळी भाजपकडून महत्वाची घोषणा केली आहे. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपनं पक्षाचे सरचिटणीस राजेश पांडे यांची पुणे महानगरपालिकेचे ‘निवडणूक प्रमुख’ म्हणून नियुक्ती केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजेश पांडे यांच्या नियुक्तीचे पत्र दिले आहेत. यात पांडे यांची पुणे महानगरपालिका निवडणुकी करिता निवडणूक प्रमूख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यात पुणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणण्यासाठी आपण ही जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन यशस्वीपणे पार पाडाल याचा मला पूर्ण विश्वास आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती पत्रात म्हटलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता राखण्यासाठी शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची पक्षाच्या महापालिका निवडणूक प्रमुख या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. मितभाषी असलेले पांडे हे गेल्या 40 वर्षांपासून संघ परिवारात सक्रिय आहेत.
मूळचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले पांडे अकरावीमध्ये शिक्षणासाठी पुण्यात आले. तेव्हापासूनच ते पुण्यात आले. करियरच्या सुरवातीच्या टप्प्यात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होते. या परिषदेमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही काम केले आहे. शैक्षणिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अभाविपनं 1993 मध्ये मुंबईत सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी मोर्चा काढला होता. त्याचे संयोजन पांडे यांनी केले होते.
त्याचबरोबर भारतीय जनता युवा मोर्चाचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे प्रभारी असताना पांडे सहप्रभारी होते. यापूर्वी त्यांनी महानगर सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले आहे. मुंबई महापालिकेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी पक्षाने अशिष शेलार यांची नियुक्ती केली आहे, त्याच धर्तीवर पुण्यासाठी पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार असून सहा आमदार आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीतील महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचं तगडं आव्हान परतवून लावण्यासाठी पांडे यांच्यावर भाजपची पुण्यातील सत्ता राखण्याची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी, संघ परिवारातील कार्यकर्ते आणि पक्षाचे तळागाळातील कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधून सत्ता प्राप्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पांडे यांची निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे.











