फुले दांपत्याच्या खानवडी गावात शाळा सुरू होण्यास सज्ज; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवी आशा

0
1

ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या मूळगावी, खानवडी येथे उभारण्यात आलेली ‘ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल’ (JSIS) आता विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सज्ज झाली आहे. ही शाळा एप्रिल २०२६ पासून सुरू होणार असून, ग्रामीण भागातील मुलींना आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची नवी संधी मिळणार आहे.

ही शाळा ‘क्रिस्टल हाऊस’ मॉडेलवर आधारित असून, शिक्षणाबरोबरच पोषण, आरोग्यसेवा, वाहतूक, शालेय साहित्य आणि करिअर मार्गदर्शन अशा सर्व बाबी एकत्रितपणे पुरवली जाणार आहेत. शाळा सीबीएसई पद्धतीची, धर्मनिरपेक्ष आणि पूर्णपणे मोफत असेल. पुणे जिल्हा परिषद, महाराष्ट्र शासन आणि Christel House India यांच्या संयुक्त भागीदारीत ही शाळा चालवली जाणार आहे.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

या उपक्रमाची कल्पना पेनसिव आर्किटेक्चरचे मुख्य वास्तुविशारद ऋषिकेश हुळी यांनी मांडली होती. ग्रामस्थांनी फुले दांपत्याच्या स्मारकाचे नुतनीकरण करण्याची विनंती केली होती, पण हुळी यांनी स्मारकाऐवजी त्यांच्या कार्याची खरी आठवण म्हणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळेचा प्रस्ताव मांडला आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला.

ग्रामपंचायतीने १२ एकर जागा दान केली, तर FIAPL (Fiat India Automobiles) यांच्या CSR निधीतून बांधकाम सुरू झाले. २४ वर्गखोल्या, विज्ञान आणि संगणक प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, कार्यालयीन विभाग, आधुनिक स्वच्छतागृहे आणि उपक्रम क्षेत्र या सुविधांसह शाळेचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. इयत्ता ५ वीपासून गरजू मुलींसाठी निवासी सुविधा देखील प्रस्तावित आहे.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

यावर्षीच्या सुरुवातीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषद, Christel House India, व उद्योग व समुदाय भागीदारांमध्ये सामंजस्य करार झाला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, “ही भागीदारी ग्रामीण भागात समतेवर आधारित शिक्षणासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. फुले दांपत्याच्या कार्याला मानवंदना म्हणून ही शाळा उभी राहणार असून, गरीब व वंचित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण पूर्णपणे मोफत मिळणार आहे.”

Christel House India चे CEO जेसन सी. मॅथ्यू म्हणाले, “ही भागीदारी म्हणजे महाराष्ट्राच्या बालदृष्टीकोनाशी सुसंगत असा ऐतिहासिक निर्णय आहे. आम्ही मुलांना केवळ शिक्षण नव्हे, तर आयुष्य घडवण्याची संधी देण्यास कटिबद्ध आहोत.”

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

संशोधनानुसार, खानवडी परिसरात १३,००० पेक्षा अधिक शालेय वयोगटातील मुले असूनही इंग्रजी माध्यम व सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या शाळा अत्यंत कमी आहेत. त्यामुळे JSIS सारखी शाळा ही त्या गरजेला सडेतोड उत्तर आहे.

Christel House International चे CEO डेव्हिड हॅरिस म्हणाले, “या शाळेमुळे परिवर्तनाची बीजे पेरली जात आहेत. ज्याप्रमाणे फुले दांपत्याने शिक्षणाच्या अडथळ्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले होते, त्याच आदर्शावर हे काम उभे आहे.”