सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अलीकडील स्ट्रकचलर ऑडिटमध्ये पुणे जिल्ह्यातील २५ पूल तातडीने दुरुस्त करणे आवश्यक असल्याचे समोर आले आहे. या पुलांमध्ये काहींमध्ये मोठ्या प्रमाणावर मजबुतीकरणाची गरज असून, काही पुलांची स्थिती गंभीर असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित कामांची योजना आणि मंजुरी प्रक्रिया सुरू असून लवकरच दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
PWD मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले, “या तपासणीच्या शिफारशी सरकारकडे सादर करण्यात आल्या असून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच दुरुस्ती सुरू होईल.”
अधिकृत आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात एकूण ८३० पूल असून त्यापैकी ११५ मोठे आणि ७१५ लहान पूल आहेत. २०२४ मध्ये त्यापैकी ३१ पुलांचे स्ट्रकचलर ऑडिट करण्यात आले. त्यात जुन्नर तालुक्यातील ९ पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे समोर आले. तसेच भिगवण, इंदापूर, शिरूर, बारामती आणि दौंड परिसरातील १६ पुलांना किरकोळ दुरुस्तीची गरज असल्याचे निदर्शनास आले आहे.
याशिवाय, इंद्रायणी नदीवरील तुळापुर येथील राज्य महामार्ग क्रमांक ११६ वरील मोठा पूल जड वाहनांसाठी असुरक्षित असल्याचे आढळले आहे. त्यामुळे PCMC (पिंपरी-चिंचवड महापालिका) यांना या पुलावरून जड वाहनांना बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे.
PWD चे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर यांनी सांगितले, “बहुतेक पुलांची किरकोळ दुरुस्ती पूर्ण झाली आहे. जुन्नर तालुक्यात काही पुलांवर मोठी दुरुस्ती आणि मजबुतीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, काही मोठ्या कामांना निधीची प्रतीक्षा आहे. निधी उपलब्ध होताच उर्वरित कामे सुरू केली जातील.”
PWD नुसार, पुणे जिल्ह्यातील सर्व पुलांची तपासणी दरवर्षी एप्रिल-मे (मान्सूनपूर्व) आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर (मान्सूननंतर) केली जाते. यावेळी जी पूल कमकुवत किंवा धोकादायक स्थितीत आढळतात, त्यांना पुढील तपासणीसाठी किंवा दुरुस्तीसाठी शिफारस केली जाते. स्ट्रकचलर ऑडिट झाल्यावरच पूल पाडावा लागेल की दुरुस्ती करावी लागेल, हे ठरवले जाते.
या तपासणी प्रक्रियेत पूलांतील साहित्याचे नमुने घेऊन टिकाऊपणा आणि वय याची चाचणी केली जाते. यात ध्वंसात्मक (destructive) व अ-ध्वंसात्मक (non-destructive) चाचण्या, तसेच विविध वैज्ञानिक उपकरणांद्वारे तपासणी केली जाते.