भोर महाड रस्त्यावरील आपटी (ता .भोर) येथे रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी खोदकाम केलेल्या मोरीच्या ठिकाणी सोमवारी (ता .१६) सकाळी झाड रस्त्यावर पडले आहे. या पडलेल्या झाडामुळे रस्त्या शेजारील विजेच्या ताराही तुटल्या आहेत. तसेच मोरीच्या भागही खचला आहे. वाहनांसाठी रस्ता बंद आहे. या भागातील मुक्कामी असणाऱ्या एसटी बस भावेखल, अंगसुळे, करंजे मार्गे भोरकडे आल्या आहेत. तातडीने उपाय योजना करण्याची स्थानिक नागरिकांनी केली आहे.
आपटी व भावेखल पूल दरम्यान रस्त्याच्या कडेचे झाड रस्त्याकडे पडले आहे. झाड पडले आहे तेथेच रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मोहरी टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे हे खोदकाम रस्त्याच्या अर्धवट भागात केलेले असून अपूर्ण आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. नेमके याच रहदारीच्या ठिकाणी विजेच्या तारा तोडून झाड पडल्याने वाहतूक बंद झाली आहे.
तसेच रहदारीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. यामुळे याठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, विजेचा प्रवाह बंद करून तातडीने रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सद्य परिस्थितीत भावेखल,अंगसुळे करंजे आंबेघर मार्गे वळसा घालून वाहनांना प्रवास करावा लागत असल्याचे करंजगावचे सुनिल मोरे यांनी सांगितले. भोर महाड मार्गावरील जागोजागी खोदकाम केलेल्या ठिकाणी रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी होत आहे.
हवामान विभागाकडून अलर्ट जारी
काल सायंकाळपासून राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर आज सकाळपासून पडलेल्या पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. अशातच हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट विभाग, सातारा घाट विभाग, कोल्हापूर घाट विभाग येथे ऑरेंज अलर्ट आणि मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक घाट विभाग, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे यलो अलर्ट जारी केला आहे.