पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील ६ इंग्रजी माध्यमाच्या शाळा बेकायदेशीर असल्याचे उघड केले असून, पालकांनी या शाळांमध्ये मुलांचा प्रवेश घेऊ नये, असा तगडा इशारा दिला आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी संपूर्ण शहरात सर्वेक्षण करून अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांची माहिती गोळा केली. या सर्वेक्षणात ६ इंग्रजी माध्यम शाळा अशा आढळल्या ज्या प्रशासकीय मान्यता नसताना चालवल्या जात होत्या.
शिक्षण विभागाकडून वारंवार सूचना आणि नोटिसा देण्यात आल्या होत्या, तरीही संबंधित शाळांनी आवश्यक मंजुरी मिळवलेली नव्हती. त्यामुळे आता या शाळांना ‘अनधिकृत’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त तनाजी नऱ्हे यांनी सांगितले, “या शाळांमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रवेश घेऊ नये. जर पालकांनी तिथे प्रवेश दिला, तर त्यातून उद्भवणाऱ्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी पूर्णतः पालकांची असेल. या शाळांपुढे सार्वजनिक सूचना फलक लावण्यात येतील. या शाळांची यादी जिल्हा परिषदेकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आली आहे.”
या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (TC) आणि मायनॉरिटी, बोर्ड परीक्षा प्रवेश अशा महत्त्वाच्या शैक्षणिक प्रक्रियांमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
हा निर्णय शहरातील शैक्षणिक दर्जा आणि कायदेशीरता सुनिश्चित करण्यासाठी घेण्यात आला असून, महापालिकेकडून पालकांना आवाहन करण्यात येत आहे की, प्रत्येक शाळेची मान्यता व परवाना तपासल्यानंतरच आपल्या मुलांना प्रवेश द्यावा, जेणेकरून भविष्यात कोणताही धोका उद्भवणार नाही.