‘स्थानिक’च्या निवडणुकीत महायुती एकत्रच, पण काही लढती मैत्रीपूर्ण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली. यावेळी मुख्यंमत्री म्हणाले की, “आमचे प्रदेशाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष आणि निवडणूक समिती यांना पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कोणाशी युती करायची किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार आहे. इतर कोणीही युतीबाबत निर्णय घेऊ शकत नाही. आमची भूमिका या निवडणुका महायुती म्हणून लढण्याची आहे. पण काही जागांवर जिथं शक्यच होणार नाही तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढतही करु” जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. मात्र, काही ठिकाणी उमेदवार वेगळे असले, तरी लढत मैत्रीपूर्ण असेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

अधिक वाचा  पक्ष प्रवेशातच वादळ काँग्रेस, उबाठा माजी नगरसेवकांचा प्रवेश; मंत्री महोदयांसमोर कार्यकर्ते भिडले बंदोबस्त तैनात

मुख्यमंत्री फडणवीस आज अकोल्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी आज सुमारे २ हजार ७०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले. यानंतर आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या संवाद सभेत बोलताना त्यांनी राज्याच्या शेतकी, ऊर्जा व प्रशासन क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती दिली.

राज्य शासनाने शेतीत आधुनिकतेचा स्वीकार करत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सौरऊर्जा, सिंचन सुविधा आणि यांत्रिकीकरण या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल आणि खर्चात लक्षणीय बचत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

‘पोकरा’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची यशस्वी अंमलबजावणी झाल्याने जागतिक बँकेने दुसऱ्या टप्प्यासाठी ५ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. यांत्रिकीकरण, शेततळ्यांचे बांधकाम आणि अन्य सुधारणा शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतील. शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज देण्यासाठी डिसेंबर २०२६ पर्यंत १६,००० मेगावॉट सौरऊर्जा उत्पादनाचे उद्दिष्ट असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर

अनुशेष २०२७ पर्यंत संपवणार

फडणवीस यांनी विदर्भाच्या विकासावर विशेष भर दिला. २०२७ पर्यंत विदर्भाचा सिंचन अनुशेष पूर्णतः संपवण्याचा शासनाचा निर्धार आहे, असे ते म्हणाले. वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाद्वारे भंडाऱ्यातून बुलडाणा व वाशीमपर्यंत पाणी पोहोचवले जाणार असून, यामुळे १० लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येईल, असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.