बेशिस्त वाहनचालकांना चाप; फर्गसन रस्त्यावर ‘एआय’ यंत्रणा; पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्‍घाटन

0

बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील प्रसिद्ध आणि नेहमीच वाहनांची वर्दळ असेल्या फर्गसन रस्त्यावर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीवर आधारित कॅमेर्‍यांद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या योजनेचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते झाले. या वेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलीस निरीक्षक (वाहतूक नियोजन) सुनील गवळी आदी उपस्थित होते.

वाहनचालकांनी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्यास, त्यांचे वाहन आणि क्रमांक एआय कॅमेर्‍यांद्वारे टिपले जाणार असून, एक मिनिटात वाहन न हटविल्यास थेट दंड आकारला जाणार आहे. विरुद्ध दिशेने येणारी वाहने, दुहेरी पार्किंग आणि रस्त्यावर अधिक वेळ वाहन उभे करणे आदी गोष्टींवरही एआयद्वारे कारवाई केली जाणार आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

फर्गसन रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होते, याचे मुख्य कारण म्हणजे वाहनचालकांची एकाहून अधिक रांगा करून पार्किंग करणे. अनेक वेळा वाहनचालक किंवा त्यांच्या चालकांकडून पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकारही घडतात. आता एआय प्रणालीमुळे चालकाचे वाहन, क्रमांक व नियमभंग याचे छायाचित्र लगेच टिपले जाईल.

काही वाहनचालक वाहन रस्त्यावर उभे करून कार्यालय किंवा खाद्यपदार्थ विकणार्‍या ठिकाणी जातात. काही वेळा चालक वाहनातच बसून राहतात व पोलिसांनी हटकल्यास वाद घालतात. या यंत्रणेमुळे अशा घटनांमध्ये घट होऊन वाहतुकीला शिस्त लागेल, असा विश्वास अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी व्यक्त केला.8

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

एआयद्वारे वाहतूक बेशिस्तीवर कारवाईची योजना ही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. शहरातील इतर गर्दीच्या भागांतही ही यंत्रणा राबवण्याचा विचार आहे. फर्गसन रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि महात्मा गांधी रस्ता हे रस्ते आदर्श रस्ता करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

– अमितेशकुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर)