रत्नागिरी-कोल्हापूरला ‘रेड अलर्ट’, महाराष्ट्रात मान्सूनची दमदार हजेरी; पाहा कुठे कोणता अलर्ट

0

महाराष्ट्रात मान्सूनने दमदार एंट्री घेतली असून कोकण, पुणे घाटमाथा आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट आणि उर्वरित राज्यासाठी येलो अलर्ट दिला आहे.

सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंत रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळला. रायगडमधील मुरूड येथे सर्वाधिक ३७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर श्रीवर्धन, म्हसळा आणि रत्नागिरीतील हर्णे येथे ३०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. मुंबईसह कोकणात दिवसभर पावसाचा जोर कायम होता. मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

अधिक वाचा  राज्यात सत्ता बदलाचे केंद्र मुंबई पुणे ठरणार? महाराष्ट्रात आता 2 नाही 3 आघाड्या? 

रेड अलर्ट : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाटमाथा. ऑरेंज अलर्ट : रायगड, पुणे घाटमाथा, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड. येलो अलर्ट : ठाणे, मुंबई, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, गडचिरोली, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. तेलंगणा, छत्तीसगड ते आंध्रप्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे, तर बंगालच्या उपसागरात आज (ता. २७) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, रायगड, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड येथे जोरदार पाऊस अपेक्षित आहे. ठाणे, मुंबई, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि गडचिरोलीतही वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि पूर, भूस्खलन यांसारख्या संभाव्य धोक्यांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनानेही आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

अधिक वाचा  अजित पवार गटातही नाराजीनाट्य; पुण्यातील बडा नेता राजीनामा देणार?