मांजरी बुद्रुक येथील गोपाळपट्टी येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रस्त्यावर पडलेल्या खड्यात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी पुणे महापालिकेच्या प्रशासना विरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली.
या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रविण रणदिवे म्हणाले की, मांजरी बुद्रुक परिसरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची खूपच दुरावस्था झालेली आहे. अरुंद व निकृष्ट दर्जाचे रस्ते, दरवर्षी पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पडणारे असंख्य खड्डे, साचत असलेली पाण्याची तळी, वाहतूक कोंडी, अपघात, अपघाती मृत्यू , वाहनचालक, पादचारीवर्ग,ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग तसेच शालेय विद्यार्थ्यांची होणारी कुचंबना हे नित्याचे झालेले आहे.
या समस्या विषयी मागील पाच ते सहा वर्षांपासून प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला होता. केवळ पॅचवर्क करून स्वतःची पाठ थोपटून घेणारं प्रशासन याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रवीण रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली गोपाळपट्टी ते दीपक नगर रस्त्यावरील खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाच्या निषेधार्थ प्रतीकात्मक वृक्षारोपण करून आंदोलन करत आहोत. यावेळी सुरज घुले, राष्ट्रवादी काँ.पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर, विभाग संघटिका वर्षा खलसे, गणेश घुले, राहुल खलसे, गणेश मरळ, सिद्धेश्वर जाधव आदी उपस्थित होते.
प्रमुख मागण्या
- मांजरी- मुंढवा रोड रस्त्याचे रुंदीकरण करणे. मुंढवा ( राजश्री शाहू विद्यालय) ते झेड कॉर्नर पर्यंत उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग उभारणे,
- मांजरी गावठाण ते पुणे-सोलापूर महामार्ग व्हाया भापकर मळा-मोरे वस्ती या रस्त्याचे रुंदीकरण करणे, केके घुले विद्यालय चौक ते वेताळ बाबा देवस्थान दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे व अनावश्यक असलेले गतिरोधक काढण्यात यावेत.
- कुंभारकर वस्ती ते गोपाळपट्टी चौक,घावटे वस्ती ते गोडबोले वस्ती आणि गोडबोले वस्ती ते म्हसोबा वस्ती मांजरी-मुंढवा रोड चौक या रस्त्यांचे रुंदीकरणासह तातडीने डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरण करणे.
- अंतर्गत वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी घुले वस्ती येथील पाटबंधारे विभागाच्या कालव्यावरील वाहतुकीस धोकादायक बनलेल्या रस्त्यावर संरक्षण भिंत उभारणे व त्या रस्त्याचे पुणे सोलापूर महामार्ग पर्यंतच्या रस्त्याची तसेच गोडबोले वस्ती ते भापकर मळा रोड तसेच रंगीचा ओढा या कालव्यावरील रस्त्यांची उभारणी करणे.
- साडेसतरा नळी ते लोणकर वस्ती चौकापर्यंत रोजच होत असलेली प्रचंड वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी येथे रेल्वे उड्डाणपूल करावा.
- मांजरी बुद्रुक येथील रेल्वे उड्डाणपूलपुलाच्या दोन्ही बाजूकडील सेवा रस्त्यांचा प्रलंबित असलेला प्रश्न तातडीने मार्गी लावून उर्वरित मुळा- मुठा नदीपर्यंतचे काम तातडीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे.
- मांजरी बुद्रुक रेल्वे उड्डाणपुलासह दोन्ही बाजूकडील सेवा रस्ते, मुळा-मुठा नदीपर्यंतचा भाग तसेच मांजरी-मुंढवा रोड, मांजरी गावठाण ते द्राक्ष बागायतदार संघ व्हाया भापकर मळा-मोरे वस्ती याचबरोबर अंतर्गत भागातही पथदिवे तातडीने बसविण्यात यावेत.
- हडपसर परिसरातील अंतर्गत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी साडेसतरा नळी ते शिंदे वस्ती पर्यंत चाबंद असलेला जुन्या बेबी कालव्यावर पूर्णपणे रस्त्याची उभारणी करण्यात यावी.
- प्रामुख्याने खूपच वर्दळ असलेल्या व अपघातप्रवण असलेल्या के.के.घुले विद्यालय चौक, घुले वस्ती येथील कालव्यावरील चौक, गोपाळपट्टी चौक, कल्याण स्कूल येथील मांजरी मुख्य रस्त्यावरील चौक, व्हीएसआय येथील तीन रस्ते, म्हसोबा वस्ती चौक मांजरी मुंढवा रोड या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीचे गतिरोधक व हायमास्ट दिवे बसविण्यात यावेत.
- मुख्य दोन्ही बाजूला पर्यावरण रक्षण करण्याकरिता प्रदूषण नियंत्रक व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करणे.
- संबंधित मिळकतदारांच्या मर्जीने व संमतीने शक्य झाल्यास घुले वस्ती कालवा ते म्हसोबा वस्ती दरम्यान च्या रस्त्याचे डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरण मार्गी लावावे.
मांजरी बुद्रुक सह आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यांच्या संदर्भात दर्जेदार व दीर्घकालीन उपाययोजना करण्यासंबंधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रवीण रणदिवे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग, पीएमआरडीए तसेच खडकवासला पाटबंधारे विभाग यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.