राज्यातील ७ खासदारांना ‘संसदरत्न’; सलग उत्कृष्ट कार्य ४ खासदारांचा विशेष सन्मान स्थायी समित्यांनाही पुरस्कार

0

संसदेमध्ये उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या संसदरत्न पुरस्कारांची घोषणा झाली असून यंदा महाराष्ट्रातील सात खासदारांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्राइम पॉइंट फाउंडेशनकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीकडून संसदरत्न खासदारांची निवड करण्यात आली.

संसदेत प्रश्न उपस्थित करणे, गैरसरकारी विधेयके मांडणे, चर्चेत सहभाग घेणे आदी निकष लावत एकूण १७ खासदारांची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सलगपणे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चार खासदारांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. यात सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), भर्तृहरी महताब (भाजप), एन. के. प्रेमचंद्रन (आरएसपी) आणि श्रीरंग बारणे (शिवसेना) यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. ज्या खासदारांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यात स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, रवी किशन, विद्युत महातो, मदन राठोड, दिलीप सैकिया, प्रवीण पटेल, निशिकांत दुबे आणि पी. पी. चौधरी (सर्व भाजप), नरेश म्हस्के (शिवसेना), वर्षा गायकवाड (काँग्रेस), सी. एन. अण्णादुराई (द्रमुक) आणि अरविंद सावंत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचा समावेश आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

स्थायी समित्यांनाही पुरस्कार

संसदेच्या कृषी आणि वित्तविषयक स्थायी समित्यांनादेखील संसदरत्न पुरस्कार दिला जाणार आहे. काँग्रेसचे खासदार चरणजित सिंग चन्नी हे कृषी समितीचे तर भर्तृहरी महताब हे वित्तविषयक समितीचे अध्यक्ष आहेत. संसदरत्न पुरस्कारांची सुरुवात २०१० मध्ये झाली होती. पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकशाही मूल्यांसाठी सक्रिय राहणाऱ्या खासदारांना प्रोत्साहित करणे तसेच लोकांमध्ये संसदीय कार्यवाही लोकप्रिय करणे हाही पुरस्कार देण्यामागचा उद्देश आहे.