गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या तर भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती पुढे ढकलेल्या जिल्हाध्यक्ष निवडी आज (ता. 13) जाहीर झाल्या. दरम्यान सांगली जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण अध्यक्ष पदासाठीही नियुक्त्या झाल्या असून संग्राम महाडिक (ग्रामीण) आणि प्रकाश ढंग यांची शरहाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे तगड्या नेत्यांनी फिल्डिंग लावली असतानाही चंद्रकांत पाटलांनी आपली ताकद वाळव्यासह प्रकाश ढंग यांच्या मागे उभारल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू झाली आहे.






सांगली जिल्ह्यात याच महिन्यात भाजप जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया झाली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी आग्रह धरला होता. तर दोन चुलत भाऊच या पदावरून एकमेकांच्या समोर उभे झाल्याने दोन गटात खुर्चीसाठी वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
दरम्यान लोकसभेनंतर या दोघा भावात अबोला निर्माण झाला होता. त्यातच भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी विधानसभेच्या तोंडावर उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने जिल्हाध्यक्ष पद रिक्त झाले होते. त्यावेळीही संग्रामसिंह देशमुख यांना संधी मिळेल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र त्यांच्या ऐवजी पक्षाचे जेष्ठ नेते दीपक शिंदे यांना संधी देण्यात आली होती.
यानंतर आता जिल्हाअध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होताच संग्रामसिंह देशमुख व पृथ्वीराज देशमुख यांनी जोरदार फिल्डींग लावली. कोअर कमिटीतील 42 जणांचे मतदान लिफाफ्यात बंद झाल्यानंतर कोणाची नियुक्ती होणार याकडे लक्ष लागले होते. तर आता नियुक्त्या जाहीर झाला असून संग्राम महाडिक यांनी बाजी मारलीय.
शहर जिल्हाध्यपदाच्याही शर्यतीत पक्षातील अनेक मात्तबार मैदान उतरले होते. पण संधी मिळाली ती चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रकाश ढंग यांना. प्रकाश ढंग हे मागील दीड वर्ष शहराचे अध्यक्ष म्हणून पाहत होते. त्यांच्यात काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. लोकसभेला महायुतीला संधी मिळाली नाही. पण विधानसभेला ढंग यांनी सुरेश खाडे आणि सुधीर गाडगीळ यांच्या मागे शहरात चांगली रसद उभी केली. यामुळे यांच्या विजय सुकर झाला. यामुळे त्यांच्या निवडीमागे या दोघांचा हात असू शकतो असेही शक्यता आता वर्तवली जातेय.
तसेच ढंग हे स्वत: मागील पाच वर्षे नगरसेवक म्हणून काम केलं असून त्यांनी सगळ्यांना सोबत घेवून काम केलं आहे. यामुळे महानगरपालिकेत भाजपमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले नाहीत. तर सदस्य नोंदणी कार्यक्रमातही जिल्ह्यात शहर आघाडीवर होते. यामुळे त्यांच्या निवडणीने आगामी स्थानिकमध्ये भाजपला मोठा फायदा मिळू शकतो.
अंतर्गत वाद नको
एकीकडे दोन दिग्गज नेते ग्रामीणसाठी इच्छुक असताना भाजपने सम्राट महाडिक यांच्या नावावर शिकामोर्तब केला आहे. यामुळे आगामी स्थानिकसाठी भाजपने मोठी रणनीती आखली असून अंतर्गत वाद टाळण्यासाठी संग्रामसिंह देशमुख व पृथ्वीराज देशमुख ही जबाबदारी दिलेली नाही. या दोघांपैकी एकाकडे जरी जिल्हाध्यक्ष पद दिले असते तर एक गट नाराज झाला असता. ही नाराजी टाळण्यासाठीच चंद्रकात पाटील यांच्याशी बोलून चंद्रशेखर बावनकुळे यांनी मधला मार्ग काढला असावा.
निशिकांत पाटलांसह जयंत पाटलांना शह
विधानसभेपूर्वी भाजपबरोबर असणारे निशिकांत पाटील उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले. कदाचित हेच भाजपला पटले नसल्याने पुन्हा एकदा वाळवा तालुक्यातच जिल्हा अध्यक्षपद देण्यात आले आहे. निशिकांत पाटलांचे वाढणारे राजकीय वजन कमी करण्यासह आगामी जिल्हा परिषदे वेळी जयंत पाटलांना शह देण्यासाठी महाडिक यांना पुढे आणले जात आहे. शिराळा आणि वाळवा तालुक्यात राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांचा गट सक्रीय आहे. याला ताकद देण्याचे काम चंद्रकांत पाटील करत आहेत. ज्याचा फायदा आगामी स्थानिकमध्ये मिळू शकतो.











