जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. एका संयुक्त मोहिमेअंतर्गत, भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानमध्ये असलेल्या एकूण 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर असे या मोहिमेचे नाव होते. या हल्ल्यात 100 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे.






भारताने या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले होते. दरम्यान आता क्रिकेटपटू शिखर धवननेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. “भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई केली आहे, भारत माता की जय.” असे शिखर धवनने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहील होते. शिखर धवनची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. मात्र, याच ट्विटनंतर अनेक युजर्सनी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला ट्रोल केले. काही लोकांनी एका वाटीसोबतचे त्यांचे फोटो शेअर केले. तर, आफ्रिदी कुठे आहे? असा सवाल अनेक युजर्स विचारताना दिसत आहेत.
पहलगाममधील नृशंस दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांच्यात जोरदार वादविवाद झाला होता.” कारगिलमध्येही हरवलं होतं. तुम्ही आधीच इतके खाली पडला आहात, अजून किती खाली पडाल, अनावश्यक टिप्पण्या करण्यापेक्षा तुमच्या देशाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे चांगले @SAfridiOfficial. आम्हाला आमच्या भारतीय सैन्याचा खूप अभिमान आहे. भारत माता की जय! जय हिंद.” अशी पोस्ट शिखर धवन याने केली होती. तर त्यावर शाहिद आफ्रिदीनेही एक पोस्ट लिहीली, त्यामुळे तो चांगलाच ट्रोल झाला होता. आता शिखर धवनच्या नव्या पोस्टमुळे अनेक युजर्सना त्यांचं भांडण आठवलं असून लोकांनी शाहिद आफ्रिदीला पुन्हा टार्गेट केलं आहे.
ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
तथापि, ऑपरेशन सिंदूर या भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर, देशातील अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी सैन्याला सलाम केला आणि ‘जय हिंद’चा नारा दिला. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, आकाश चोप्रा आणि प्रग्यान ओझा, सुरेश रैना, इरफान पठाण, वीरेंद्र सेहवाग यांनी लष्कराच्या कारवाईचे कौतुक केले. याशिवाय, टीम इंडिया आणि कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू वरुण चक्रवर्तीनेही ‘ऑपरेशन सिंदूर’चा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला, जो आर्मीने प्रसिद्ध केला होता. “या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे, तिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन केले जात होते” असे भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटले होते.












