मुख्यमंत्र्यांकडून मंत्री अतुल सावे यांना झटका, आमदार तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर मंजूर कामांना स्थगिती

0
9

नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का दिला आहे. मंत्री अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. भाजप आमदार तुषार राठोड यांनी अतुल सावे यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केले होती. त्यांच्या तक्रारीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. आमदार तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली आहे.

अतुल सावे यांनी नांदेड जिल्ह्यातील कामांना मंजुरी दिली. पण आमदार तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या तांडा वस्तीच्या 7 कोटी 25 लाखांच्या कामांना स्थगिती दिली आहे. आम्हाला विश्वासात न घेता अतुल सावे यांनी तांडा वस्तीच्या कामांना मंजुरी दिल्याची तक्रार तुषार राठोड यांनी केली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय म्हणजे अतुल सावे यांच्यासाठी धक्का मानला जातोय.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

सरकारमध्ये काय सुरु?

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होऊन आतापर्यंत चार महिने झाले आहेत. या चार महिन्यात अनेक घडामोडी घडून आल्या आहेत. सुरुवातीला बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटत नसल्याने सरकार स्थापन होण्यास विलंब झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदावर दावा होता. पण भाजपदेखील मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याने अखेर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडावा लागला.

यानंतर जागावाटपावरुन महायुतीत रस्सीखेच बघायला मिळाली. एकनाथ शिंदे यांना गृह खातं हवं होतं. पण ते खातं देखील भाजपच्या वाटेला गेलं. यानंतर पालकमंत्रीपदावरुन रस्सीखेच बघायला मिळाली. नाशिक आणि रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री अद्याप ठरलेले नाहीत. त्यामुळे महायुतीत सातत्याने नाराजी असल्याच्या किंवा मतभेद असल्याचे वृत सातत्याने समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामांना देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या कामांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याची माहिती समोर येत आहे.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार