महाराष्ट्रात शहांच्या प्लानवर काम सुरु भाजपनं गियर बदलला; दोन्ही DCMचे होमग्राऊंड ताब्यात घेण्यासाठी टीम देवेंद्रचे शिलेदार सक्रिय

0

मुंबई: ज्यावेळी सत्ताधाऱ्यांचं बळ प्रचंड असतं. विरोधकांची ताकद नाममात्र असते. तेव्हा सत्तेतले वाटेकरीच एकमेकांचे विरोधक होतात. राज्याच्या राजकारणात याचा प्रत्यय देणाऱ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महायुतीनं पुन्हा सत्ता स्थापन केली. महायुतीकडे मिळालेला जनादेश त्यांच्या सरकारला कोणताच धोका नाही. पण महायुतीमधील मित्रपक्षच आता एकमेकांसाठी धोकादायक ठरु लागले आहेत.

सत्ता स्थापना, मंत्रिपदांचं वाटप, पालकमंत्रिपद यावरुन भाजप, शिवसेनेत धुसफूस पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली, तर काही निर्णय रद्द करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याची चर्चा रंगली. नागपुरात गेल्याच आठवड्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि राज्यपालांचं भाषण झालं. पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. त्यावेळीही शिंदे नाराज झाल्याची चर्चा रंगली होती.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

दुसरीकडे भाजपनं एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जोर मारला आहे. मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ असलेले गणेश नाईक ठाण्यात सक्रिय झाले आहेत. वनमंत्री असलेले नाईक ठाण्यात जनता दरबार घेत ओन्ली कमळचा नारा देत आहेत. ठाणे शहरचे भाजप आमदार संजय केळकर सातत्यानं पालिकेतील भ्रष्टाचार समोर आणत आहेत. ठाणे पालिकेवर कित्येक वर्षे शिंदे यांचं वर्चस्व राहिलं आहे. विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, गणेश नाईक अशी तगडी फळी ठाण्यात सक्रिय झाली आहे. शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात अडचणीत आणण्याची खेळी भाजपनं सुरु केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं उत्तम जमतं, अशी चर्चा कायम होते. पण आता भाजपनं अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्येही विस्तार सुरु केला आहे. भोर मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे निष्ठावंत संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर आहेत. गेल्या ५२ वर्षांपैकी ४५ वर्षे भोरची आमदारकी थोपटेंच्या घरात आहे. यंदाच्या विधानसभेत थोपटेंचा राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर यांनी पराभव केला. भोर मतदारसंघ बारामतीत येतो. थोपटे कुटुंबानं कायम पवार कुटुंबाविरोधात राजकारण केलं आहे. त्यामुळे थोपटे भाजपमध्ये आल्यास बारामतीत पक्षाचं बळ वाढेल.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

२०२९ मध्ये भाजप स्वबळावर लढेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आधीच केलेली आहे. भाजपनं विधानसभेला १३२ जागा जिंकताच पक्षानं पुढील विधानसभेच्या दृष्टीकोनातून तयारी सुरु केली आहे. भाजपनं टाकलेला पुढचा गियर त्यांच्याच मित्रपक्षांसाठी अडचणीचा आहे. शिंदे आणि पवारांच्या बालेकिल्ल्यातच भाजपनं ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. भाजपचं वाढतं वर्चस्व त्यांना पुढील निवडणुकीत उपयोगी ठरेल. पण भाजपचं शतप्रतिशत मिशन त्यांच्या मित्रपक्षांना गोत्यात आणणारं ठरणार आहे. बालेकिल्ल्यांमध्ये पडझड झाल्यास शिंदे आणि अजित पवारांसाठी पुढील राजकारण अवघड असेल.