दिल्ली, चंदीगड, पिंपरी चिंचवडच्या पाठोपाठ आता पुण्यातील रस्त्यांवरही हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी फॉग कॅनॉन मशिनद्वारे पाण्याची फवारणी केली जाणार आहे. पाणी फवारणीमुळे हवेतील धुलीकणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी महापालिकेने पाच फॉग कॅनॉन मशिन खरेदी केल्या असून शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर त्याचा वापर केला जाणार आहे.






केंद्र सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एनसीएपी) अंतर्गत देशातील प्रदूषणाचे प्रमाण अधिक असणाऱ्या शहरांमधील प्रदूषण कमी करण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार, महापालिकेने पाच फॉग कॅनॉन मशिन नुकत्याच खरेदी केल्या आहेत. शहरातील पाच परिमंडळांसाठी प्रत्येकी एका मशिनचा वापर प्रदूषण कमी करण्यासाठी केला जाणार आहे. दिल्ली, चंदीगड, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड या शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी मागील काही वर्षांपासून संबंधित मशिनचा वापर केला जात आहे. त्याच धर्तीवर पुण्यात देखील हा उपक्रम राबविला जात आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी.. यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना महापालिकेच्या आवारामध्ये फॉग कॅनॉन मशिनचे प्रात्यक्षिक नुकतेच दाखविण्यात आले.
अशी होणार फवारणी
फॉग कॅनॉन मशीनसाठी एका ट्रकवर ६ हजार लिटर पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. ट्रकच्या मागील बाजूस नोझल असलेले उच्च दाबाचे पंप बसविण्यात आले आहेत. या नोझलद्वारे पाण्याचे अतिसुक्ष्म कण बाहेर फेकले जातात. त्यामुळे हवेच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणारे धुलीकणांचे हवेतील प्रमाण कमी करण्यास मदत होते. शहरातील महापालिका भवन ते वारजे (कर्वे रस्ता), स्वारगेट-कात्रज-कोंढवा (सातारा रोड), स्वारगेट शेवाळेवाडी (सोलापूर रोड), संगमवाडी-येरवडा-केसनंद फाटा, दांडेकर पूल ते धायरी फाटा (सिंहगड रोड) या रस्त्यांवर फवारणी केली जाणार आहे.











