बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. हे प्रकरण सध्या राज्यभर गाजत असून, वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात सुरुवातीपासून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान आज अंजली दमानिया या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, यावेळी तिथे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील उपस्थित होते. तिघेही एकत्र भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे, तिघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. आपण मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये आल्याचं दमानिया यांनी यावेळी म्हटलं.






नेमकं काय म्हणाल्या दमानिया?
गेल्या दोन महिन्यांमध्ये जालन्याचे शेतकरी मला दोनदा येऊन भेटून गेले होते. त्यांना मी अश्वासन दिलं होतं की मी तिथे येते. काय सत्य परिस्थिती आहे त्याची पाहाणी करते. आणि तुमच्याकडून माहिती घेते, कारण मुंबईपर्यंत सर्वांनाच पोहोचता येत नाही. म्हणून मी इथे येण्याचं ठरवलं होतं आणि जालन्यात आले म्हणून मी दादांची देखील भेट घेतली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, असं अंजली दमानिया यांनी यावेळी म्हटलं आहे.
जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपीला पकडण्याच्या मागणीसाठी जे आक्रोश मोर्चे निघाले त्या प्रत्येक मोर्चाला मनोज जरांगे पाटील उपस्थित होते. दरम्यान आजच्या या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोठी मागणी केली आहे. संतोष देशमुख प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करायल हवे. कारण तेच कर्तेकर्वीते आहेत, असा आरोप यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.











