विधानसभा निवडणूक संपताच महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यादृष्टीने महाराष्ट्रभरात महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये पक्षप्रवेश सुरू आहेत. यातही राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये नेत्यांचा ओघ जास्त आहे. शिवसेनेने तर महाराष्ट्रभरात ऑपरेशन टायगर राबवले. यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात माजी आमदार, पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश संपन्न झाले. पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपला मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळविला आहे.
विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या तत्कालीन आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. शिवसेनेचे दोन वेळचे माजी आमदार सुजित मिणचेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून पुन्हा शिवसेनेत परतले. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे हेही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचारात सक्रिय राहिले. सत्यजित कदम हेही भाजपमधून शिवसेनेत आले.
कोकणात माजी आमदार राजन साळवी आणि सुभाष बने यांचाही वाजतगाजत शिवसेना प्रवेश झाला. पुण्यात काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनीही पक्षप्रवेश केला. मराठवाड्यात वैजापुर-गंगापुर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
आता एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपली ताकद वाढवायला सुरूवात केली आहे. राधानगरीतून विधानसभा निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढविलेले बिद्री साखर करखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. त्यापाठोपाठ अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यात लक्ष घातले आहे.
सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख, अजित घोरपडे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. अलिकडेच त्यांची मिरजेत माजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासोबत बैठक झाली. स्वत: अजित पवार हेही या नेत्यांच्या संपर्कात आहेत. साताऱ्याच्या दक्षिण भागात ताकद वाढविण्यासाठी अजित पवार यांनी माजी मंत्री आणि काँग्रेसचे सात टर्म आमदार राहिलेल्या विलासकाका उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिंह उंडाळकर यांना पायघड्या अंथरल्या आहेत.