केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या दोन भाच्यांनी जगतपूर गावात एकमेकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर केंद्रीय मंत्र्यांचा दुसरा भाचा गंभीर जखमी झाला असून त्याच्या आईच्या हाताला गोळी लागली. कुटुंबातील वादातून हा गोळीबार झाल्याचे समोर आले आहे.
नित्यानंद राय यांचे भाचे विश्वजित आणि जयजीत यादव हे बिहारमधील जगतपूर गावात राहत होते. दोघेही शेतकरी. सुरूवातीला दोघांमध्ये पाण्यावरून वाद सुरू झाला. दोघांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. त्यानंतर दोघांमध्ये धाकटा असलेल्या जयजीतने विश्वजितवर गोळीबार केला. त्यानंतर विश्वजितनेही भावावर गोळ्या झाडल्या.
गोळीबारामध्ये त्यांच्या आईच्या हातालाही गोळी लागली. परिसरातील नागरिकांना त्यांनी रुग्णालयात दाखल केले. पण रुग्णालयात नेण्याआधीच विश्वजितचा मृत्यू झाला. तर जयजीतची प्रकृतीही गंभीर आहे. भाजपचे आमदार डॉ. एन. के. यादव यांच्या रुग्णालयात दोघांवर जयजीत व त्याची आई हिना देवी यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिस अधिक्षक प्रेरणा कुमारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी या घटनेबाबत आम्हाला माहिती मिळाली. घरगुती वादातून दोघांनी एकमेकांवर गोळीबार केला. दोघांमध्ये वाद सुरू असतानाच आई तिथे आलली. त्यामुळे त्यांच्या हातालाही गोळी लागली, अशी माहिती प्रेरणा कुमारी यांनी दिली.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली. केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या भाच्यांनीच एकमेकांवर गोळीबार केल्याने पोलिसांचीही धावपळ उडाली. भाच्यांकडे पिस्तुल कुठून आले, त्याचा परवाना होता का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास हाती घेण्यात आला आहे. तपासानंतर नेमकं काय घडलं, हे स्पष्ट होईल.