गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन राजकारण तापले आहे. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाकडून देण्यात आला आहे. त्यातच नागपुरात दोन दिवसांपूर्वी मोठा हिंसाचार उफाळला. नागपुरात दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. आता नागपुरातील या संपूर्ण हिंसाचारामागे नेमकं कोण आहे, याचा नाव पहिल्यांदाच समोर आले आहे.






पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाईंडचे नाव पहिल्यांदा समोर आले आहे. नागपुरात झालेल्या हिंसाचारामागे फहीम खान असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. फहीम खान याने लोकांना भडकवण्याचे काम केले. त्यानंतर ही हिंसा घडली. नागपूरमधील गणेशपेठ पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या दुसऱ्या तक्रारीमध्ये उघड झाले आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष आहे.
तक्रारीत नेमकं काय?
या तक्रारीनुसार जमावाने अंधाराचा फायदा घेत महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गांधी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. औरंगजेबाच्या थडग्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. तसेच औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष फहीम खान यांच्या नेतृत्वाखाली पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी, लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आणि धार्मिक शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने जमावाने कुऱ्हाडी, दगड, काठ्या आणि इतर धोकादायक शस्त्रांचा वापर केला.
महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन नागपुरात सोमवारी रात्री हिंसाचार झाला. या हिंसाचारादरम्यान, समाजकंटकांकडून पोलिसांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आलं. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, या हिंसाचारादरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याची माहितीही समोर आली आहे. अंधाराचा फायदा घेत काही आरोपींनी इतर महिला पोलिसांनाही शिवीगाळ करत अश्लील शेरेबाजी केली.
नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ४६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील काही आरोपींनी चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर महिला पोलिसासोबत हा प्रकार केला. हिंसाचारातील आरोपींनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला स्पर्श करुन वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही महिला पोलिसांना जमावातील काही लोकांनी शिवीगाळ देखील केल्याची माहिती समोर येत आहे.











