रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन, ८० जणांना अटक, ५५ सोशल मीडिया अकाऊंट रडारवर; नागपूरमधील सद्यस्थिती काय?

0

सोमवारी रात्री मध्य नागपुरातील महाल परिसरात दोन गटात दंगल पेटली होती. त्यानंतर आता नागपूरमधील तणावपूर्ण शांतता असून या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करत आतापर्यंत ८० जणांना अटक केली आहे. याशिवाय सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवणाऱ्यांवरही पोलिसांची नजर आहे.

महाल भागात हिंसाचार उसळल्यानंतर येथील इंटरनेट बंद करण्यात आले आहे. सायबर पोलिसांकडून सोशल मिडिया अकाऊंटस तपासण्यात येत आहेत. आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडीओ पोस्ट करणारे ५५ सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

महाल परिसर भागात कलम १४४ लागू करण्यात आले असून मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या आदेशानंतर नागपूरमधील काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, तहसील, लाकडगंज, शांती नगर, सक्करदारा, नंदनवन, इमामावडा, यशोधरा नगर आणि कपिलनगर या भागांचा समावेश आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

महाल व्यतिरिक्त रात्री हंसापुरी भागातही तोडफोडीची घटना घडली आहे. यावेळी जुना भंडारा रोडवर बेकायदेशीर जमावाने अनेक वाहने आणि आयुष क्लिनिक जाळण्याचा प्रयत्न केला. रात्री १०.३० ते ११.३० दरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर हंसापुरी परिसरातही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान नागपूर दाखल होणार असून ते महाल परिसराची पाहणी करणार आहेत. याशिवाय देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात महत्त्वाची बैठक होणार असल्याचीही महिती आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात निवेदन सादर करण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती