“आरएसएस हे विष आहे”, तुषार गांधींच्या विधानावरून वाद; माफीच्या मागणीस स्पष्ट नकार! गांधींच्या मारेकऱ्याचे वंशज आता…. भिती व्यक्त 

0

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केरळमध्ये एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या विधानावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. तुषार गांधींच्या हस्ते केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये दिवंगत गोपीनाथन नायर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान तुषार गांधींनी भारतीय जनता पक्ष व RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत विधान केल्यानंतर त्यावरून दोन्ही संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मात्र, आपण आपल्या भूमिकांवर ठाम असल्याचं तुषार गांधींनी स्पष्ट केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

काय म्हणाले होते तुषार गांधी?

तुषार गांधींनी या कार्यक्रमादरम्यान भाजपा व आरएसएस यांच्यावर टीकात्मक टिप्पणी केली होती. “आपण भारतीय जनता पक्षाचा पराभव करू शकतो, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विष आहे. ते या देशाचा आत्माच नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला या घडामोडींची भीती वाटायला हवी. कारण जर आत्माच नष्ट झाला, तर सारंकाही नष्ट होईल”, असं तुषार गांधी या कार्यक्रमात म्हणाले होते.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

तुषार गांधींच्या या विधानावरून भारतीय जनता पक्ष व आरएसएसकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. केरळमध्येच भाजपा व आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. काही कार्यकर्त्यांनी तुषार गांधी यांचा रस्ता अडवण्याचाही प्रयत्न केला. केरळमधील सत्ताधारी माकप व विरोधातील काँग्रेस पक्ष या दोघांनी या कृत्यांचा निषेध केला आहे.

मी माफी मागणार नाही – तुषार गांधी

दरम्यान, भाजपा व आरएसएसकडून तुषार गांधींनी माफी मागण्याची व विधान मागे घेण्याची मागणी केली जात आहे. त्यावर तुषार गांधींनी स्पष्ट नकार दिला आहे. “त्यांची इच्छा आहे की मी जे काही म्हणालो त्याबद्दल माफी मागावी. माझं विधान मागे घ्यावं. पण मी म्हणालो मी ते करणार नाही. मी जेव्हा काही बोलतो, तेव्हा मी त्याबद्दल माफी मागावी लागेल किंवा ते विधान मागे घ्यावं लागेल असा विचार अजिबात करत नाही”, असं तुषार गांधी शुक्रवारी कोचीतील एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले.

अधिक वाचा  भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या स्थितीत! राजकीय भूकंपही शक्य? एकनाथ शिंदेंची किंमत फक्त १२ जागा

“या असल्या प्रकारांमुळे गद्दारांना लोकांसमोर उघडं पाडण्याचा माझा निर्धार आणखी पक्का होतो. कारण हा लढा स्वातंत्र्यसंग्रामापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे. आता आपल्या सर्वांसमोर एकच शत्रू आहे. त्या सगळ्यांना उघडं पाडायलाच हवं. मला तर भीती वाटते आहे की महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे वंशज आता गांधींच्या पुतळ्यावरही हल्ला करतील की काय. सवयीप्रमाणे ते आता माझ्या पणजोबांच्या पुतळ्यावरही गोळ्या झाडणार का?”, असा प्रश्नही तुषार गांधींनी यावेळी उपस्थित केला