भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. एकही सामना न गमावता जेतेपदावर नाव कोरलं. 12 वर्षानंतर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली आहे. खरं तर आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीनंतर गौतम गंभीरचं कौतुक होत आहे. गेल्या काही दिवसात त्याच्या प्रशिक्षकपदावर टीका होत होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत अपात्र ठरल्यानंतर टीकारांनी हद्द ओलांडली होती. पण गौतम गंभीरने शांतपणे टीम इंडियाच्या बांधणीत हातभार लावला. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत स्पर्धा जिंकण्याचं मोठं आव्हान होतं. पण भारताने त्याची उणीव भासू दिली नाही. अंतिम सामन्यापर्यंत भारताने पाच सामने जिंकले. भारताने साखळी फेरीत 3 सामने , उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वात पुन्हा एकदा टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. तसेच आतापर्यंत केलेल्या टीकांना विजयाने उत्तर दिलं आहे. विजयानंतर रोहित शर्माने मन मोकळं केलं.
‘आम्ही संपूर्ण स्पर्धेत खूप चांगले क्रिकेट खेळलो. आम्ही आमच्या पद्धतीने निकाल मिळणे ही एक उत्तम भावना आहे, आम्ही हा सामना कसा खेळलो याबद्दल खूप आनंदी आहे. हे माझ्यासाठी स्वाभाविक नाही पण ते असे काहीतरी आहे जे मला खरोखर करायचे होते. जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तुम्हाला संघाचा पाठिंबा हवा असतो आणि ते माझ्यासोबत होते २०२३ च्या विश्वचषकात राहुल द्रविडने पाठिंबा दिला आणि आता गौतम गंभीर खंबीरपणे उभा राहिला.’ असं रोहित शर्माने सामन्यानंतर सांगितलं. गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दित भारताने पहिलं जेतेपद मिळवलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने 50 षटकात 7 गडी गमवून 251 धावा केल्या आणि विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भाराताने 49 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. भारताने हा सामना 4 विकेट आणि 6 चेंडू राखून जिंकला. या सामन्यात रोहित शर्माने जबरदस्त खेळी केली. रोहित शर्माने 83 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 76 धावा केल्या.