पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांना ऊत आला आहे. भारताने न्यूझीलंडला हरवून चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. देशभरात विजयाचा जल्लोष सुरू आहे. पण पुण्यात विजयी जल्लोषाला गालबोट लागलं आहे. विजयी जल्लोष सुरू असताना पुण्यात एका टोळक्याकडून एक तरुणावर चाकूने सपासप वार केले. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
टीम इंडियाच्या विजयानंतर पुण्यात एकच जल्लोष सुरू होता. ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरून फटाके फोडत होते तर कुठे डिजेच्या तालावर नाचत होते. अशातच पुण्यातील एफसी रोडवर एका टोळक्याने एका तरुणावर हल्ला केला. जल्लोष दरम्यान टोळक्याकडून एका तरुणाला चाकूने मारहाण करण्यात आली. ४ ते ५ जणांनी चाकू, बेल्टने या तरुणाला मारहाण केली. मारहाण करत या तरुणाला गंभीर जखमी केलं. चाकुने बेल्टने आणि दगडाने तरुणाला मारहाण केली. मारहाण करणाऱ्या एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. जखमी तरुणाला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.
दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन ट्रॉफीचा सामना दुबईत पार पडला. या क्रिकेट सामन्यात भारत विजयी होताच पुण्यातील मावळात घराघरात जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून हातात तिरंगा घेऊन भारताच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला.