स्वारगेट बस डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करून त्याच्या गावातून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.मात्र आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणातील नेमकं सत्य समोर आणण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे. हेच सत्य समोर आणण्यासाठी सध्या दत्ताच्या मोबाईलचा शोध सुरू आहे. आरोपीच्या मोबाईलमधून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असून पोलिसांकडून त्याच्या मोबाईलचा शोध घेतला जात आहे.






पुणे पोलिसांकडून नराधम दत्ता गाडे याच्या मोबाईल चा शोध सुरू आहे. नराधम गाडे याने मोबाईल शिरूरमध्ये एका शेतात लपवल्याची माहिती समोर आली आहे. घटना घडल्यावर मोबाईलवरून कोणा कोणाला फोन केले याचा तपास केला जाणार आहे. तसेच मोबाईलमध्ये असलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन वरून कधी कोणाला पैसे दिले आहेत का याचा सुद्धा पोलिसांना घ्यायचा शोध आहे. घटना घडल्यावर गाडे याने मोबाईल बंद केला होता. पुणे पोलिसांकडून आरोपी गाडे याची चौकशी सध्या सुरू आहे.
आरोपी गाडेची चौकशी सुरू
पुण्यातील स्वारगेट बलात्कार आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली. काल कोर्टात हजर केल्यानंतर दत्ता गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दत्ता गाडे याला शिरुरमधून त्याच्या मुळगावातून अटक करण्यात आली होती. दरम्यान, आरोपी जेरबंद झाल्यानंतर या अत्याचार प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. आरोपी आणि तरूणी हे आधीपासून ऐकमेकांना ओळखत असून त्यांच्या आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती आली.
आरोपीचा फोन ठरणार महत्त्वाचा पुरावा
पीडित तरुणीवर बलात्कार झालाच नाही. दोघांमध्ये जे झालं ते दोघांच्या संमतीने झालं होतं. दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यापासून ओळखतात. त्यांचे कॉल रेकॉर्डस काढले तर समजेल, असंही आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे. त्यामुळे आरोपीचा फोन हा या प्रकरणात नवे वळण आणण्याची शक्यता आहे. त्यासाठी पुणे पोलीस फोनचा कसून तपास करत आहे.












