राज्य विधीमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्षपदी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आमदार सुरेश धस यांना भाजपने पुन्हा डावलले आहे. या अगोदरही जिल्हा नियोजन समितीवर आमदार सुरेश धस यांना डावण्यात आले होते.






राज्य विधीमंडळात विविध प्रकारच्या समित्या असतात. यात महायुतीत भाजपच्या वाट्याला ११ समित्या आल्या आहेत. या समित्यांवरील अध्यक्षांची निवड भाजपकडून करण्यात आली आहे. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या समित्यांची घोषणा बाकी आहे. दरम्यान, भाजपला मिळालेल्या समित्यांपैकी धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्ष म्हणून केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची वर्णी लागली आहे. दुसऱ्यांदा आमदार झालेल्या नमिता मुंदडा यांना स्थान देण्यात आले आहे.
यापूर्वीही समितीवर सदस्यांमधून जिल्हा नियोजन विधीमंडळ होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये आमदार सुरेश धस यांच्याऐवजी नमिता मुंदडा यांनाच संधी दिली गेली होती. नियोजन समितीवर धस यांना डावलल्याने त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार आहेत. आष्टीचे आमदार सुरेश धस ४ वेळा विधानसभा आणि १ वेळा विधानपरिषदेवर आमदार राहिले आहेत. सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणात थेट भूमिका घेतल्यामुळे ते राज्यभरात चर्चेत आहेत. मात्र भाजपने त्यांना विधीमंडळ समितीवर अध्यक्षपदी स्थान दिलेले नाही.
आमदार नमिता मुंदडा या मंत्री पंकजा मुंडे यांच्या विश्वासू आहेत. तर सुरेश धस यांनी निवडून आल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेत मुंडेंवर आरोप केले होते. याचाच फटका कुठे तरी आमदार सुरेश धस यांना बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आमदार सुरेश धस यांना डावलत आमदार नमिता मुंदडा यांची विधिमंडळ रुग्णालय समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सुरेश धस यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.











