उद्धव ठाकरेंना Z+ कवच अन् शिवसेनेच्या या आमदारांच्या सुरक्षेत घट ‘यांच्या’ दिमतीचे पुण्यातील 48 जवान पुन्हा दलात

0

राज्याच्या गृहखात्याने माजी आमदार आणि मंत्र्यांच्या सुरक्षेत करण्यात आलेल्या कपातीवरुन सध्या महायुतीत सध्या अंतर्गत धुसफूस सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका शिंदेगटाला बसला होता. शिंदे गटाच्या जवळपास 20 आमदारांच्या सुरक्षेत लक्षणीय कपात करण्यात आली आहे. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘झेड प्लस’ सुरक्षाकवच कायम ठेवण्यात आले आहे. यावरुन सध्या शिंदे गटात देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांचा गट उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड करुन बाहेर पडला तेव्हा त्यांच्या जीवाला धोका असल्याच्या कारणामुळे शिवसेनेच्या आमदारांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था प्रदान करण्यात आली होती. ‘वाय’ दर्जाच्या सुरक्षेतंर्गत या आमदारांच्या सुरक्षेसाठी तीन शस्त्रधारी पोलीस सुरक्षारक्षक आणि पोलीस वाहन तैनात होते. याशिवाय, या आमदारांच्या निवासस्थानी पोलीस संरक्षण पुरवण्यात आले होते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असेपर्यंत हा दर्जा कायम होता. मात्र, पोलिसांच्या विशेष संरक्षण विभागाने आढावा घेऊन शिंदे गटाच्या या आमदारांना ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आमदारांच्या सुरक्षेसाठी फक्त एकच शस्त्रधारी पोलीस सुरक्षारक्षक तैनात असेल. त्यामुळे इतके दिवस आजुबाजूला सुरक्षेचा डामडौल असण्याची सवय झालेल्या शिंदे गटाच्या आमदारांचा हिरमोड झाला होता.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दिमतीला तर 48 पोलीस सुरक्षारक्षक होते. मात्र, गृहखात्याच्या निर्णयामुळे आता तानाजी सावंत यांच्याकडे फक्त एक सुरक्षारक्षक उरला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पुणे पोलीस आयुक्तांचा विरोध असूनही तानाजी सावंत यांनी हट्टाने 48 पोलीस सुरक्षारक्षक पदरी बाळगले होते. मात्र, तानाजी सावंत यांच्या सुरक्षेचा बडेजाव संपुष्टात आला आहे.

शिंदे गटाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न?

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याची जोरदार चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन सचिवांची नियुक्ती केली होती.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

उदय सामंत यांनी उद्योग खात्याच्या धोरणात्मक निर्णयप्रक्रियेत आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदे यांना सुरुवातीला स्थान देण्यात आले नव्हते.

यानंतर आता शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.

या एकापाठोपाठ घडणाऱ्या घटनांची मालिका पाहता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिंदे गटाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात रंगली आहे.