दिल्लीत २७ वर्षांनी भाजपला पुन्हा एकदा सत्ता मिळाली. आम आदमी पार्टीला धूळ चारत भाजपने विजय मिळवला. यानंतर आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. अद्याप भाजपने मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर केलेलं नाही. मात्र अमेठीच्या माजी खासदार स्मृती इराणी यांच्या नावाची चर्चा होत आहे. भाजप घराणेशाहीच्या विरोधात असले तरी अनेक राजकीय नेत्यांच्या नातेवाईक आणि अपत्यांना तिकीट दिलं होतं. पण घराणेशाही असलेल्या नेत्याला मुख्यमंत्री केलेलं नाही. त्यामुळे प्रवेश शर्मा यांचे नाव मागे पडत आहे. तर रेखा गुप्ता, शिखा रॉय यांच्याही नावाची चर्चा आहे. मात्र यात रेखा गुप्ता यांचे नाव आघाडीवर आहे. पण दिल्लीत केजरीवाल यांच्या तोडीस तोड असा चेहरा आणि महिला मुख्यमंत्री करायीच असेल तर स्मृती इराणी यांचं नाव चर्चेत येत आहे. राजकीय अनुभव, भाजपचा आक्रमक चेहरा आणि २०३० मध्ये केजरीवालांना पुन्हा चितपट करण्यासाठी स्मृती इराणी याचं नाव पुढे आल्यास आश्चर्य वाटायला नको.






देशातील ज्या राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात भाजपची सत्ता आहे तिथं एकही महिला मुख्यमंत्री नाहीय. त्यामुळे किमान एक महिला मुख्यमंत्री असावी असा निर्णय भाजप घेऊ शखते. तसंच अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनीही आतिशी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं होतं. त्यामुळे केजरीवालांच्या त्या खेळीला महिला मुख्यमंत्री देऊन भाजप शह देऊ शकते.
कोण आहेत स्मृती इराणी?
स्मृती इराणी यांनी राजकारणात येण्याआधी हॉटेलपासून अभिनय क्षेत्रापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलंय. पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता, पण शिक्षण पूर्ण केलं नाही. त्यांनी हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम केलं. वडिलांच्या मदतीने दिल्लीत ब्युटी प्रोडक्टचं मार्केटिंग केलं. याचवेळी त्यांनी मुंबईत मॉडेलिंगमध्ये नशिब अजमावलं.
१९९८ मध्ये स्मृती इराणी यांनी मिस इंडियासाठी मुलाखत दिली आणि त्यांची निवड झाली होती. पण वडिलांनी या स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला. मात्र आईने मदत केल्यानं त्या या स्पर्धेत सहभागी झाल्या. स्मृती इराणी स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचल्या पण विजेतेपद पटकावता आलं नाही. आईने खर्च केलेले पैसे परत करण्यासाठी स्मृती इराणी यांनी नोकरी शोधायला सुरुवात केली. मॉडेलिंगसाठी ऑडिशन देऊनही नोकरी मिळाली नाही. त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी सुरू केली. क्योंकी सास… साठी ऑडिशन दिली पण त्यात निवड झाली नाही. त्यानंतर २०००-२००८ पर्यंत प्रसिद्ध टीव्ही मालिका क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकेत तुलसी हे पात्र साकारण्याची संधी मिळाली. यातून स्मृती इराणी यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
स्मृती इराणी यांनी २००१ मध्ये पारसी आंत्रप्र्योन्योर जुबीन इराणींसोबत लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. तर जुबीन यांचं पहिलं लग्न झालं होतं. त्यांच्या पहिल्या पत्नीचीही एक मुलगी आहे. स्मृती इराणी यांचे आजोबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. त्यामुळे लहानपणीच स्मृती इराणींही संघाच्या विचारात वाढल्या. त्यांची आईसुद्धा जनसंघाचं काम करायच्या.
२००३ मध्ये स्मृती इराणी यांनी भाजप प्रवेश केला. तर २००४ मध्ये महाराष्ट्र यूथ विंगच्या व्हाइस प्रेसिडंट बनल्या. २००४ मध्ये दिल्लीच्या चांदणी चौक मतदारसंघातून त्यांना काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला होता. २०१० मध्ये स्मृती इराणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि महिला विभागाच्या अध्यक्ष बनल्या. २०१४ मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून राहुल गांधींविरोधात त्या लोकसभा निवडणूक लढल्या. पराभवानंतरही त्यांना मोदी सरकारने केंद्रीय मंत्री बनवलं. २०२४ च्या निवडणुकीत स्मृती इराणी यांना काँग्रेसच्या केएल शर्मा यांनी पराभूत केलं.











