गुहागर दि. १० (रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ गिमवी विभाग क्र. ३ ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी आणि विभागीय मध्यवर्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महामाता राजमाता जिजाऊ, शिक्षणाची जननी माता सावित्रीबाई, महासूर्याची सावली, नऊ कोटी लेकरांची माऊली त्यागमाता रमाई या मातांचा संयुक्त जयंती महोत्सव सौ. प्रियांका दिलीप मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी धम्मगिरी बुद्धविहार, मौजे काळसुर कौंढर येथे मोठ्या जल्लोषात व हर्षोउल्हासात संपन्न झाला.
सदर प्रसंगी धम्मध्वजाच ध्वजारोहण स्थानिक शाखेच्या अध्यक्षा सौ. स्मिता मोहिते यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर धार्मिक पूजाविधी चंद्रकात गमरे गुरुजी (चिखली) यांनी सुमधुर व गोडवाणीने संपन्न केला, कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्याध्यक्ष दीपक मोहिते, सहसचिव दिलीप मोहिते, विभागीय महिला मंडळाच्या कार्यकारिणीनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित केली, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली कुणाल गमरे (चिखली) यांनी लाघवी व प्रभावी भाषाशैलीत करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, तर पाहुण्यांचे स्वागत चंद्रकला जाधव यांनी केले.
सदर प्रसंगी कार्याध्यक्ष दीपक मोहिते, माजी अध्यक्ष सुनील जाधव, माजी चिटणीस मनोहर मोहिते, विश्वस्त श्रीपत गोपाळ गमरे, मुंढर गावचे पोलिस पाटील निलेश गमरे, सरपंचा सौ. अमिषा गमरे, अनिल जाधव, कौंढर गावच्या सरपंचा सौ. सिया गुजर, विभाग कार्यकारिणी, महिला मंडळ, विविध शाखांचे पंचपदाधिकारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी महिलांचा स्नेहमेळावा व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, दुपार नंतर दुसऱ्या सत्रात विभागीय अध्यक्ष राजू मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते, सदर सभेत मुंढर गावच्या सरपंचा अमिषा गमरे आणि कौंढर गावच्या सरपंचा सिया गुजर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांनी तिन्ही महामातांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकत त्यांनी आयुष्यात अनेक संकटांना तोंड देत त्यावर कशी मात केली व समाजाचे भले केले याची माहिती देत सर्व महिलांनी तिन्ही महामातांच्या जीवनावर आत्मपरीक्षण करून त्यांचे विचार अंगीकारले पाहिजेत असे आवाहन करीत कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.
गुहागर तालुक्यात प्रथमच बौद्धांची पतसंस्था निर्माण झाली असून तिचे भागपत्र (Share Certificate) तयार असून कार्यालयातून ते घेऊन जावेत व ज्यांच्या वर्गण्या थकीत असतील त्यांनी थकबाजी जमा करून पतसंस्थेला सहकार्य करावे असे विनम्र आवाहन पतसंस्था विश्वस्त मंडळाद्वारे करून सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या, माजी अध्यक्ष सुनील जाधव यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. गिमवी विभाग क्र. ३च्या महिला मंडळाने कार्याध्यक्ष व पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन दीपक मोहिते यांना पतसंस्थेकरिता सदिच्छा भेट म्हणून देणगीस्वरूपात टेबल फॅन दिला.
अध्यक्षीय भाषणात राजू मोहिते “भविष्यात सदर कार्यक्रमासारखे अजूनही स्तुत्य उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्यात येतील तसेच त्याद्वारे विभागाची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी होममिनिस्टर सारखे बुद्धीला चालना देणारे तिकीट शो, लॉटरी शो, क्यूझ शो आयोजित करू, तसेच महिलांना संधी दिली तर महिला कश्याप्रकारे कार्यक्रम यशस्वीपणे राबवू शकतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे आजचा कार्यक्रम होय, सर्वच महिलांनी सुनियोजित, सूत्रबद्ध, शिस्तबद्ध असा कार्यक्रम एकहाती राबवून आपल्या सामर्थ्याची प्रचिती दिली आहे” असे नमूद केले. सोबतच देवघर शाखाच्या सौ. नुतन प्रणित सावंत, पुर्वा मयुर मोहिते, काजल अशोक मोहिते, मुंढर शाखेच्या दिक्षिता सागर सुर्वे, जानवळे शाखेच्या कु. भुमिका जाधव यांनी भाषणातून तसेच मुंढर शाखेच्या सौ. सारिका राजेश मोहिते (रमाई गीत), जानवळे शाखेच्या महिला मंडळाने (सावित्रीबाई ओवी), चिखली शाखेच्या सौ. सुचिता गमरे (बुद्ध गीत), कु. नैना गमरे (रमाई गीत), कौंढर शाखेच्या रमाई महिला मंडळ (स्वागतगीत), सौ. सारिका जाधव (रमाई गीत) यांनी भाषण व गीतगायनातून शुभेच्छापर विचार व्यक्त केले तर कु. सुमेध महेंद्र मोहिते व कु. सम्यक महेंद्र मोहिते यांनी इंग्रजी भाषेतून संविधान उद्देशीका वाचन केले.
सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या कौंढर गाव महिला मंडळ, मध्यवर्ती महिला मंडळ, विभाग अधिकारी, सर्व शाखांचे पदाधिकारी, सभासद, सदस्य यांचे आभार मानून कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रियांका दिलीप मोहिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.