अख्ख्या पिंपरी-चिंचवडला माहीतय २५ वर्षे काम करतोय; एवढा कंजूषपणा मी दिलदार आहे: अजित पवारांनी स्पष्ट सांगितले

0

“कुणीतरी अफवा उठवतो, २६ जानेवारीला २१ जिल्हे जाहीर केले जाणार… मात्र, आता एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही. आता जे चाललेय ते चांगले चाललेले आहे. ज्यावेळेस वाटेल, त्यावेळेस सरकार निर्णय घेईल. आतातरी कोणताच जिल्हा निर्माण करण्यात येणार नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्याचेही विभाजन होणार नाही,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा विभाजनाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (दि.६) चिखलीतील जाधववाडी येथे झाले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.

तत्पूर्वी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाषणात पुणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यास नवीन जिल्ह्यास ‘शिवनेरी’ नाव द्यावे, भविष्याचा विचार करता पिंपरी-चिंचवड शहरासाठी नवीन जलस्रोत निर्माण करावेत, अशा मागण्या केल्या. तोच धागा पकडून पवार म्हणाले की, आतातरी कोणताच जिल्हा निर्माण करण्यात येणार नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्याचेही विभाजन होणार नाही. २०५४ ला पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या पुण्यापेक्षा जास्त होणार आहे. त्यामुळे शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. सध्याच्या पाण्याचा पुरवठा कमी पडणार आहे. भविष्याचा विचार करता शेजारील टाटांच्या धरणातील पाणी घ्यावे लागेल. समुद्राचे पाणी प्रक्रिया करून पिण्यासाठी वापरता येईल का, असाही विचार सुरू आहे.

अधिक वाचा  पुण्यात रात्रीत सर्वात मोठी घडामोड; पवारांची बिन आवाजाची काठी चालली अन् ‘देवाभाऊं’चे मनसुबे उधळले

ज्याचे क्रेडिट त्याला द्यायला शिका : महेश लांडगेंना सुनावले

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय उभारणीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे विधान आ. महेश लांडगे यांनी केल्यानंतर पवार यांनी सुनावले की, महेश लांडगे यांना माझे नाव घ्यायला का वाईट वाटले, हे मला माहीत नाही. परंतु, अख्ख्या पिंपरी-चिंचवडला माहीत आहे की, १९९२ला मी तुमचा खासदार झालो. १९९२ ते २०१७ पर्यंत कोणी पिंपरी-चिंचवड सुधारणा केल्या? आज २५ वर्षे झाली. प्रत्येक गोष्ट मी पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष देऊन करत असतो. येथील अधिकाऱ्यांना विचारा, या इमारतींमध्ये मी किती वेळा येतो, किती वेळा चौकशी करतो आणि किती वेळा बसतो. शेवटी आपण महायुतीमध्ये आहोत. एवढाही कंजूषपणा दाखवू नका, मी दिलदार आहे. ज्याने केले, त्याला त्याचे क्रेडिट देत असतो. ज्याने चांगले काम केले आहे, त्याला चांगले म्हणायला शिका.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

माझे जरी अनधिकृत होर्डिंग असले तरी काढा : फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यासह विविध शहरांमध्ये अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्जचे प्रमाण वाढले आहे. त्यावर उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून सुरू केलेला होर्डिंग्जचा शोध आणि सर्वेक्षण प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे अनधिकृत होर्डिंगवर सहज कारवाई करणे शक्य होणार आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंग कोणाचेही असो काढून टाका, त्यावर माझा फोटो अथवा नाव असले तरीही कारवाई थांबवू नका!