खंडणी प्रकरण आरोपी वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, बीड न्यायालयाचा निर्णय

0
1

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी ९ डिसेंबरला निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. हे हत्या प्रकरण खंडणीशी संबंधित आहे. खंडणी प्रकरणी अटकेत असलेला आरोपी आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आरोपी वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यातही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संशयित मास्टरमाईंड वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराडला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड कोर्टासमोर हजर करण्यात आलं त्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.

वाल्मिक कराड न्यायालयात व्हिसीद्वारे उपस्थित

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती सीआयडीने न्यायालयात दिली. त्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वाल्मिक कराडला बुधवारी (२२ जानेवारी) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते. वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने वाल्मिक कराड याच्याकडून जामिनासाठी प्रयत्न होणार का, पहावं लागणार आहे. मात्र, मकोका लागल्याने वाल्मिक कराडला तूर्तास जामीन मिळणे अवघड असल्याचं मानलं जातं आहे.

वाल्मिक कराडचं सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल

वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे एकत्र असल्याचं एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. हे फुटेज २९ नोव्हेंबरचं आहे असंही सांगितलं जातं आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया यांच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत. वाल्मिक कराडने अवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज असल्याचा दावा केला जातो आहे. केज शहरातील विष्णू चाटेच्या कार्यालयात वाल्मिक कराड २९ नोव्हेंबरला आला होता. त्यावेळी त्याच्यासह सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे सुद्धा या फुटेजमध्ये पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित पीएसआय राजेश पाटील हेसुद्धा यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसोबत दिसत आहेत. वाल्मिक कराडविरोधात हा महत्त्वाचा पुरावा असल्याचं बोललं जातं आहे.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले. त्यानंतर काही दिवसांतच एक मारेकरी सोडून इतरांना अटक करण्यात आली. मात्र वाल्मिक कराड हाती येत नव्हता. वाल्मिक कराड ३१ डिसेंबरला पुणे पोलिसांना शरण आला. त्यानंतर त्याचा ताबा सीआयडीने घेतला. त्याला बीड या ठिकाणी नेण्यात आलं होतं. दरम्यान वाल्मिक कराड शरण आला यावरुनही विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. त्याला पोलीस अटक का करु शकले नाहीत? हे पोलिसांचं अपयश नाही का? असा सवाल जितेंद्र आव्हाड, संजय राऊत यांनी केला होता.