राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरस ठरली असून 230 जागांचे बहुमत मिळाले आहे. या उलट सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीच्या पदरात आत्ताच्या घडीला विरोध पक्षनेता देखील मिळलेला नाही. अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोडांवर महाविकास आघाडीत दुफळी माजली आहे. आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने स्वतंत्र लढण्याची मानसिकता केली आहे. याबाबत पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. मात्र आता या नाऱ्यालाच पक्षातून विरोध होताना दिसत असून अनेक ठिकाणी आघाडीचा पर्याय योग्य असल्याचे स्थानिक नेते म्हणत आहेत. पुण्यात देखील अशीच स्थिती आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आता एकत्र न लढता वेगवेगळं लढावं, कार्यकर्त्यांना बळ द्यावं आणि पक्ष वाढवावा, अशी भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतली. तसेच आगामी निवडणुकीमध्ये ‘एकला चलो रे’चा नारा दिला. तर चांदा ते बांदापर्यंत आम्ही आगामी स्वराज्य संस्था निवडणुकां स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
यानंतर नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात शिवसेनेकडे खंबीर नेतृत्व आणि चेहरा नसल्याचे समोर आले आहे. यावरून राऊत यांनी अशी कशी घोषणा केल्याचा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच आता पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी देखील राऊत यांच्या भूमीकेला विरोध करणारे वक्तव्य केल्याने शिवसेनेतच दोन मतप्रवाह असल्याचे उघड झाले आहे.
एकीकडे संजय राऊत यांनी स्वतंत्र लढण्याची भूमीका घेतली असतानाच वसंत मोरे (तात्या) यांनी महाविकास आघाडीत लढलो तर चांगलं यश मिळू शकतं असं वक्तव्य असे वक्तव्य केलं आहे. यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
ज्या अनेक कार्यकर्त्यांना संधी देता यावी अशी भूमी घेताना राऊत यांनी, अनेक कार्यकर्त्यांना आघाडीमध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे म्हटले होते. तसेच कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे असा दावा केला होता. कार्यकर्त्यांच्या मागणीसाठीच आम्ही नागपूर आणि मुंबईसह सर्व महापालिका स्वबळावर निवडणूक लढवू, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. मात्र त्यांच्या या भूमीकेला विविध जिल्ह्यात विरोध होत असल्याचे आता समोर येत आहे.
मनसे, वंचित असा प्रवास करून शिवसेनेत दाखल झालेल्या तात्यांनी आघाडीसोबत राहिलो तरच पक्षाला चांगला फायदा होईल, असे म्हटले आहे. तात्यांनी पुण्यामध्ये झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत आपला मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी, पुणे शहरातील महापालिका निवडणूक आपण महाविकास आघाडी म्हणून लढवली पाहिजे असं लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला वाटतं असल्याचे म्हटले होते.
पुण्यात जेव्हा चारचा प्रभाग होतो, तेव्हा सेनेची ताकद कुठेतरी कमी पडते. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून लढलो तर पक्षाला त्याचा फायदा होईल, असाही ठाम दावा त्यांनी केला आहे. तर प्रत्येक पक्षात दोन मतप्रवाह असतातच, ज्यात एक लोकप्रतिनिधींचा आणि दुसरा एक कार्यकर्त्यांचा असतो. मी लोकप्रतिनिधींची भावना येथे मांडल्याचे वसंत मोरे म्हणाले.
दरम्यान राऊत यांच्या वक्तव्यानंतर महायुतीतील नेत्यांना आघाडीवर टीका करण्यासाठी आयती संधी मिळाली होती. यामुळे आघाडीतील नेते देखील खवळले होते. या नेत्यांनी राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेना झोपलेली अशी खोचक टीका केली होती. ज्याला प्रत्युत्तर वसंत मोरे यांनी देताना वेळ आली की याचे उत्तर देऊ असे म्हटलं होते. यानंतर आता वसंत मोरे यांनी राऊत यांच्या घोषणेच्या विरूद्ध भूमीका घेतली आहे. याच भूमीकेमुळे शिवसेनेतच दोन मतप्रवाह असल्याचे उघड होत आहे.