बावधन येथील सर्वे क्र. 159 येथे महावितरणचे 220/22 kV चे नवीन अत्याधुनिक सबस्टेशन सुरू होत आहे. या प्रकल्पामुळे बावधन, बाणेर आणि बालेवाडी परिसरातील वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. या भागातील वीजपुरवठा अधिक सुरळीत व कार्यक्षम होईल, तसेच ग्राहकांना अखंडित वीज सेवा उपलब्ध होईल.
आज या प्रकल्पाची पाहणी महावितरण पुणे एम.एस.डी.सी.एल.चे मुख्य अभियंता श्री. अनिल कोलप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांच्यासोबत अधीक्षक अभियंते श्री. प्रकाश कुरसंगे, श्री. विठ्ठल भुजबळ, श्री. संदीप हाके, कार्यकारी अभियंते श्री. राजेंद्र पवार, श्री. संतोष चुरे, तसेच स्थानिक नगरसेवक श्री. दिलीप वेडेपाटील आणि बावधन सिटीझन फोरमचे सदस्यही उपस्थित होते.
दीर्घकाळाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आणि अनेक तांत्रिक अडचणींवर मात करत हा महत्त्वाचा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या उपक्रमामुळे परिसरातील औद्योगिक, व्यावसायिक आणि नागरी विकासाला चालना मिळणार आहे. वीजपुरवठा अधिक स्थिर व उच्च गुणवत्तेचा झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांचे जीवनमान सुधारेल, तर औद्योगिक व व्यावसायिक प्रकल्पांसाठी पोषक वातावरण निर्माण होईल.
याबाबत नगरसेवक दिलीप वेडेपाटील म्हणाले “बावधन परिसरातील नागरिकांच्या वीजसमस्यांचे निराकरण करणे हे माझ्यासाठी प्राधान्य होते. या प्रकल्पामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक स्थिर होऊन येथील विकासाला नवे बळ मिळेल. नागरिकांना दर्जेदार सुविधा पुरवणे हे माझे उद्दिष्ट आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य व पाठिंबा यामुळेच हा प्रकल्प यशस्वी झाला आहे. भविष्यात देखील परिसराच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहू.”
बावधन सिटीझन फोरमच्या सदस्यांनी या प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण पाठिंबा दिला असून, स्थानिक रहिवाशांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिलेला सक्रिय सहभाग कौतुकास्पद आहे. महावितरणच्या या पावलामुळे परिसरातील विकासाला गती मिळणार असून, भविष्यातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल.