राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 56 वरून 10 जागांवर आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांसाठी दंड थोपटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीदरम्यान विधानसभेत गाफील राहिल्याची कबुली राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. विरोधकांना मिळालेल्या यशामागे संघाच्या प्रचाराचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.






राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय आढावा बैठकीला बुधवारी सुरुवात झाली. महाविकास आघाडीच्या सकाळच्या सत्रात पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते. लोकसभेतलं घवघवीत यशामुळे आपण गाफील राहिलो. विधानसभा हातचा मळ असल्याचा समज केला. दुसरीकडे पराभवाची गांभीर्याने नोंद करत विरोधकांनी, संघाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती. घरोघरी गेले हिंदुत्वाचा प्रचार केला. दोन्ही बाजू मतदारांना सांगितल्या. त्याचा परिणाम निकालाच्या रूपात त्यांना मिळाल्याचे पवार म्हणाले.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी होणार मोठे बदल
निवडणुकांचे यश शंभर टक्के नसते. 1952 च्या निवडणुकीत काँग्रेसने 90% जागा जिंकल्या होत्या 1957 च्या निवडणुकांमध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसला अनेक जिल्ह्यात शून्य तर काही जिल्ह्यात एक दोन जागाच मिळाल्या, असेही पवार म्हणाले. आज पासून कामाला लागा आपल्याकडे संपूर्ण पाच वर्ष आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीत मोठी जोखीम घेणार आहे. महिलांना 50 टक्के तर खुल्या गटात 60 टक्के उमेदवारी तरुणांना दिली जाईल. प्रस्थापित घराण्यांमधील युवकांना प्राधान्य नसेल. पक्ष संघटनेत 70 टक्के वाटा नव्या चेहऱ्यांना देण्याची गरज असल्याचं सांगण्यात आला असून 35 च्या पुढच्या कार्यकर्त्यांनी आता राज्य पातळीवर काम करण्याचं आवाहन पवारांनी आढावा बैठकीत केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात येत्या दोन दिवसात महत्त्वाचे निर्णय होणार असल्याचं सांगण्यात आलंय.
अजितदादांच्या पडद्यामागे हालचाली
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या सात खासदारांना संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. सात खासदारांची भेट घेत सोबत येण्याची ऑफर देखील सुनील तटकरे यांनी दिल्याची माहिती आहे. दरम्यान संपर्क झालेल्या सातही खासदारांनी सुनील तटकरे यांची ऑफर नाकारल्याची माहिती देखील आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांना फोन करत तटकरे यांच्या बाबतची नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.











