विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीला विसरुन पुढे चला असं आवाहन केलं आहे. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पुढचा कार्यक्रम हाती दिला आहे. असं असतानाच आता सांस्कृतिक कार्य मंत्री आणि भाजपाचे मुंबईमधील प्रमुख आशिष शेलार यांनी आज ‘शिवतिर्थ’ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळेस भाजपाचे नेते मोहित कंम्बोज देखील उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळेच आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा-मनसे युती दिसणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. असं असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाने याबाबत सकारात्मक प्रतिसाद नोंदवला आहे.
…तर योग्य निर्णय घेतला जाईल
शिंदेंच्या पक्षाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी मनसेला महायुतीमध्ये सहभागी करुन घेण्यासंदर्भात सूचक विधान केलं आहे. मनसेच्या रुपानं महायुती विस्तृत होणार असेल आणि मतविभागणी टळणार असेल तर योग्य निर्णय घेतला जाईल,” असं देसाईंनी म्हटलं आहे. एवढ्यावरच न थांबता विधानसभेला शिंदेंमुळे मनसे-भाजपाची युती झाली नाही का? यासंदर्भातही शंभुराज देसाई बोलले आहेत.
मनसेही वैचारिक साधर्म्य…
“शिंदेमुळे विधानसभेत मनसेशी युती झाली नाही हे खरं नाही,” असंही शंभुराज देसाईंनी संभाव्य युतीबद्दल बोलताना स्पष्ट केलं आहे. तसेच शिंदेंमुळे विधानसभेला मनसेबरोबर महायुतीचं जुळलं नाही असं मनसेनं अधिकृत काही म्हटलं तर आम्ही आमची भूमीका मांडू, असंही शंभुराज देसाईंनी स्पष्ट केलं आहे. “भाजप शिवसेनेची नैसर्गिक युती आहेच. मनसेही वैचारिक साधर्म्य असणारा पक्ष आहे. महापालिकेत मनसेसोबत युतीबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील,” असं शंभुराज देसाईंनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादीत फोडाफोडीच्या आरोपावरुन टोला
बापलेकीला सोडून अजित पवार गटात येण्याची ऑफर शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांना देण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरु असून यावरुन शंभुराज देसाईंनी प्रतिक्रिया नोंदवताना ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊतांना टोला लगावला आहे. “राष्ट्रवादीत फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे असं संजय राऊतांनी म्हणणं चूकीचं आहे. ते हवेत गप्पा मारतात. अजित पवारांकडे पक्ष, चिन्ह सर्व आहे. लोक त्यांच्या पक्षात जात असतील तर चूक काय?” असा सवाल देसाईंनी उपस्थित केला आहे. “शिवसेनेतही अनेक जण प्रवेशासाठी उत्सुक आहेत. आगामी काळात अनेकांचे प्रवेश होतील,” असं शंभुराज देसाईंनी यावेळी म्हटलं.