पुणे पालिका निवडणूक स्वबळावरच; शिवसेनेचे ४० ते ५० जागांवर लक्ष मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता त्यासाठी आम्ही तयार: शिवसेना नेत्यांचे संकेत

0

‘पुणे महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणून लढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत; परंतु, मुंबई, ठाणे वगळता उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होईल असे वाटत नाही. तिथे मैत्रीपूर्ण वातावरणात लढती होण्याची शक्यता असून, त्यासाठी आम्ही तयार आहोत,’ अशा शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.

नीलम गोऱ्हे यांनी या वेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांमध्ये महायुती म्हणून बेरजेच्या राजकारणाबाबत भाष्य केले. ‘महापालिका निवडणुका लवकर घेऊन ‘प्रशासक राज’ बदलले पाहिजे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच महायुतीच्या घटक पक्षांची वेगळी ताकद आहे. बेरजेच्या राजकारणासाठी महायुती व्हावी, असा प्रयत्न आहे; मात्र, जिथे शक्य नाही, तिथे महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढू,’ असे त्या म्हणाल्या.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर

‘गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सात खासदार निवडून आले. त्यानंतर विधानसभेतही अपक्षांसह साठ आमदार असून मतांचा टक्काही वाढला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना आरोग्य, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, नगरविकास, पाणीपुरवठा अशी चांगली खाती मिळाली असून, त्या माध्यमातून शहरवासीयांचे प्रश्न सोडविण्यावर आमचा भर असेल,’ असेही त्यांनी सांगितले. ‘विधान परिषदेत २२ वर्षे आमदार म्हणून मराठी भाषेचा प्रसार, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे संवर्धन अशा विविध विषयांवर काम केले, तर विधान परिषदेच्या उपसभापती पदासोबत सभापतींच्या रिक्त पदाचा कार्यभारही सांभाळताना महिलांची सुरक्षितता, करोना काळात आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण, सायबर गुन्हे रोखण्यासाठी ‘एसओपी’ अशा विविध विषयांवर काम केले,’ असेही त्यांनी नमूद केले.

अधिक वाचा  मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार?

महिलांना हवी संधी

लोकसभेसह विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी २०२९पासून होणार आहे. तोपर्यंत लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार असून, या आरक्षणात बड्या नेत्यांच्या कुटुंबातील ‘ताईसाहेब’, ‘राणीसाहेब’ यांच्याऐवजी समाजासाठी झटणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना संधी द्यावी,’ असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी सर्व राजकीय पक्षांना केले.

शिवसेनेचे ४० ते ५० जागांवर लक्ष

पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारंभी स्वबळाची चाचपणी करणाऱ्या शिवसेनेने (शिंदे) सावध भूमिका घेऊन शहरातील ४० ते ५० जागांवर लक्ष केंद्रित केले. हडपसर, पर्वती, वडगाव शेरी आणि सिंहगड रस्ता परिसरातील वाढती ताकद लक्षात घेऊन जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू झाले आहे.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

महापालिका निवडणुकीसाठी संघटनबांधणी, पक्षाची ध्येयधोरणे आणि महायुती म्हणून राज्य सरकारची कामे आणि योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. हडपसर, पर्वती, वडगाव शेरीसह खडकवासला मतदारसंघांतर्गत येत असलेल्या सिंहगड रस्ता परिसरात शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे या भागातून जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील, या दृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे.