राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर ही भेट झाली. या भेटीनंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत या भेटीमागील गुपित उलगडले. यावेळी त्यांनी या भेटीबद्दल पक्षातील एका नेत्याला कल्पना दिल्याचेही सांगत त्यांचं नावही जाहीर केले.
मी आज शरद पवार साहेबांकडे सकाळीच गेलो होतो. त्यांची वेळ घेतली नव्हती. ते आजारी असल्याचं कळलं होतं. सव्वा दहा वाजता गेलो होतो. ते तब्येत बरी नसल्याने झोपले होते. त्यामुळे मी एक दीड तास थांबलो. ते उठले आणि मला बोलावलं. ते बिछान्यावरच झोपलेले होते. तब्येत बरी नव्हती. मी बाजूला खुर्ची ठेवून बोलत होतो. दीड तास चर्चा केली. मी कोणतंही राजकारण घेऊन आलो नाही. मंत्री आणि आमदार म्हणून आलो नाही. पक्षीय भूमिका नाही, असे छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलं.
‘या’ एकाच नेत्याला होती कल्पना
या पुढे त्यांनी या भेटीपूर्वी पक्षातील एका वरिष्ठ नेत्याला कल्पना दिल्याचे म्हटलं. मी ओपनमध्ये बोलतो आणि साहेबांकडेही बोलतो. या प्रश्नावर मी कुणाच्याही घरी जायला आणि कुणाशीही भेटायला मला कमीपणा वाटत नाही. पक्षात कुणाशी चर्चा नाही. फक्त प्रफुल्ल पटेल यांना फोन करुन सांगितलं. त्यावेळी त्यांना कोण-कोणत्या विषयांवर चर्चा करणार आणि काय कागदपत्र देणार, याचीही कल्पना दिली होती. त्यांनी मला जा असे सांगितल्यानंतर मी आलो, असे छगन भुजबळांनी म्हटले.
काल गंभीर आरोप, अन् आज बंगल्यावर भेट
दरम्यान कालच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मात्र त्यानंतर आज सकाळी भुजबळ अचानक सिल्वहर ओकवर पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. ‘ राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. शरद पवार यांनी बारामती येथून फोन केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला’, असा दावा छगन भुजबळ यांनी केला होता. त्यानंतर आज लगेचच छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले होते.