संतोष देशमुखांच्या हत्याकांडातील आरोपी सीआयडीच्या रडारवर, हेही येणार गोत्यात; १०० बँक खाते गोठवली

0

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणाशी संबंधित फरार आरोपी आता सीआयडीच्या रडारवर आहेत. फरार आरोपींचे तसेच त्यांच्या नातेवाईकांचे बँक खाते गोठवण्यात आल्याची मोठी बातमी आहे. १०० हून अधिक खाती गोठवण्यात आली आहेत. याबरोबरच वाल्मिक कराडांसह इतर आरोपींची संपत्ती जप्त करण्यासाठीही कोर्टाची परवानगी मागण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील चार आरोपी अटकेत असून उर्वरित तीन आरोपी तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी यांची यांचा शोध घेतला जात आहे. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी या आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिल्याने आता सीआयडी त्या दिशेने देखील पावले उचलत आहे. यामध्ये रोज नवनवे खुलासे समोर येत असून आता सीआयडीने संबंधित आरोपींच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. आरोपींच्या नातेवाईकांचे आधार लिंक असलेले सर्व खाते सीज करण्याचे पत्र बँकांना दिले आहे. अशा १३ बँका असून त्यांच्याकडे असलेले १०० हून जास्त खाते आता गोठवण्यात आले आहेत. या खात्यामध्ये नेमकी किती रक्कम आहे, याबाबतची माहिती देखील लवकरच समोर येईल अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

सीआयडीच्या पथकाने आज दिवसभरात २५ जणांची चौकशी केली असून आतापर्यंत दीडशे जणांची चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित आणखी बऱ्याच जणांची चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहेत. तसेच हत्येची घटना घडल्यानंतर आरोपींनी जे मोबाईल गाडीमध्ये सोडले होते त्याचा फॉरेन्सिक डेटा येण्यासाठी पाच दिवस लागणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. तर हा डेटा मिळाल्यानंतर आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील फरार आरोपींच्या अटकेसाठी आता सीआयडीने ठोस पावले उचलल्याचे दिसत आहे.